मुंबई बातम्या

फ्लेमिंगोंना आता ‘जीपीएस-जीएसएम रेडिओ टॅग’ ;राज्यात पहिल्यांदाच पुढाकार; बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा प्रकल्प – Loksatta

नागपूर : भारतीय उपखंडातील फ्लेमिंगोचे प्रजनन आणि स्थलांतर हे वीसाव्या शतकापासून एक कोडे राहिले आहे. संपूर्ण भारतातील प्रजनन आणि प्रजनन नसलेल्या ठिकाणी फ्लेमिंगोच्या स्थलांतरणाचे रहस्य उलगडण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने राज्यात पहिल्यांदा मुंबई येथे िरिगग आणि सॅटेलाईट टेलिमेट्री अभ्यासाचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गत सहा फ्लेमिंगोंना सौर उर्जेवर चालणारे ‘जीपीएस-जीएसएम रेडिओ टॅग’ लावण्यात आले आहेत.
ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्य हे अंदाजे अडीच लाख स्थलांतरित पक्ष्यांचे घर आहे. सप्टेंबर ते मे या कालावधीत सुमारे १.३ लाख फ्लेमिंगो येथे येतात. जे मुंबई महानगर क्षेत्राच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आणि औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्यातील लेसर आणि ग्रेटर फ्लेमिंगोचे स्थलांतर आणि अधिवास वापराचे नमुने समजून घेण्यासाठी सॅटेलाइट टेलिमेट्री अभ्यास सुरू केला आणि त्यांच्या संवर्धनासाठी व्यवस्थापन कृती सुचवल्या. जानेवारी ते एप्रिल २०२२ या कालावधीत उच्च-भरतीच्या ठिकाणी सहा फ्लेमिंगो पकडले आणि त्यांना सौर ऊर्जेवर चालणारे ‘जीपीएस-जीएसएम रेडिओ टॅग’ लावले. उपसंचालक डॉ. पी. सथियासेल्वम आणि शास्त्रज्ञ मृगांक प्रभू यांच्यासह बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या चमूने ही कामगिरी पार पाडली. सहाय्यक अभिरक्षक डॉ समीर बाजारू यांनी टेलिमेट्री अभ्यासाची रचना आणि तांत्रिक तपशील पाहिले.

अभ्यास कशासाठी?
या अभ्यासाद्वारे मिळालेली माहिती पक्ष्यांचे स्थलांतर आणि ‘सेंट्रल एशियन फ्लायवे’ मधील त्यांची स्थिती समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, असे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक डॉ. बिवाश पांडव म्हणाले.

अचूक माहिती आता उपलब्ध..
पारंपरिक पद्धतीचे फायदे अनेक असले तरीही त्याला मर्यादा आहेत. टेलिमेट्री टॅग या मर्यादांना बाजूला सारून अचूक माहिती देतात, असे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे उपसंचालक राहुल खोत यांनी सांगितले.

सहाही फ्लेमिंगोंचे नामकरण
जीपीएस-जीएसएम रेडिओ टॅग करण्यात आलेल्या सहाही फ्लेमिंगोंना नावे देण्यात आली आहेत. भारतात प्रथम ग्रेटर फ्लेमिंगो प्रजननाचा शोध लावणाऱ्या कच्छचे राव खेंगरजी तिसरा साहिब बहादूर यांच्या नावावरून ‘खेंगरजी तिसरा’ हे नाव, १९व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस कच्छच्या पक्ष्यांवर पुस्तके आणि संशोधन लेख प्रकाशित करणारे ब्रिटिश निसर्गशास्त्रज्ञ आणि पक्षीशास्त्रज्ञ कॅप्टन सी.डी. लेस्टर यांच्या नावावरून ‘लेस्टर’, प्रख्यात निसर्गतज्ज्ञ चार्ल्स मॅककॅन यांच्या नावावरून ‘मॅककॅन’, कच्छमध्ये लेसर फ्लेमिंगो प्रजननाची पुष्टी करणारे प्रख्यात पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या नावावरून ‘सलीम’, पक्षीशास्त्रज्ञांपैकी एक हुमायून अब्दुलाली यांच्या नावावर ‘हुमायूं’, नवी मुंबई प्रदेशाच्या नावावरून ‘नवी मुंबई’ हे नाव देण्यात आले आहे.
प्रकल्पाला परवानगी..
सध्या, सर्व फ्लेमिंगो ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्य आणि लगतच्या पाणथळ प्रदेशात फिरत आहेत. राज्याच्या वनखात्याने या अभ्यास प्रकल्पाला परवानगी दिली. मुंबई महानगर विभाग विकास प्राधिकरण यांनी या अभ्यासासाठी निधी दिला. कांदळवन कक्ष या प्रकल्पाचे निरीक्षण करत आहे.

Source: https://www.loksatta.com/nagpur/flamingos-gps-gsm-radio-tag-first-initiative-state-project-bombay-natural-history-society-amy-95-2927303/