मुंबई बातम्या

मुंबईतील २९ ठिकाणी NIA चे छापे, महत्त्वाचे पुरावे हस्तगत; मुंबई-दिल्लीत हिंसा भडकावण्याचा कट? – Maharashtra Times

मुंबई: राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबईत केलेल्या धडक कारवाईनंतर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या कारवाईत एनआयएच्या हाताला काही आक्षेपार्ह पुरावे लागले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई आणि दिल्लीत हिंसा भडकावण्यासाठी कट आखला जात होता, असा निष्कर्ष ‘एनआयए’कडून काढण्यात आल्याची माहिती आहे. यासंदर्भात एनआयएकडून (NIA) अद्याप कोणतीही सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, आता या पुराव्यांच्याआधारे एनआयएकडून लवकरच संबंधितांवर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. (NIA Raids in Mumbai)

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सोमवारी आणि मंगळवारी मुंबई परिसरात जवळपास २९ ठिकाणांवर छापे टाकले होते. हे सर्व छापे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तींच्या मालमत्तांवर टाकण्यात आले होते. एनआयएने या सर्व व्यक्तींची झाडाझडती घेतली होती व त्यांची कसून चौकशी केली होती. यावेळी एनआयएने अनेक महत्त्वाचे पुरावेही जप्त केले होते.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे अनेक साथीदार, शार्प शूटर आणि हवाला ऑपरेटर यांच्यावर हे छापे टाकण्यात आले होते. मुंबईतील भेंडीबाजार, माहीम, नागपाडा, गोरेगाव या परिसरात एनआयएने धाडी टाकल्या. माहीम परिसरात चार ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. यापैकी एक छापा माहीम दर्ग्याचे ट्रस्टी सुहेल खंडवानी यांच्या घरी टाकण्यात आला होता. पोलिसांनी सुहेल खंडवानी यांच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तसेच छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूटला ग्रँट रोड येथून ताब्यात घेण्यात आले होते.

मुंबईत कोणाच्या मालमत्तांवर NIA चे छापे पडले?

मुनाफ मोहम्मद युसूफ शेख, लिली अपार्टमेंट, अंबोली
सुरेश शेट्टी, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, ओशिवरा
आतिफ शेख, प्लुटो बिल्डिंग, ओशिवरा
फिरोज हमीद शर्मा, हिल रोड वांद्रे
गुड्डू पठाण, बाब इब्राहिम बिल्डिंग, माझगाव
मन्नत हावरा, बंगालीपुरा, अ‍ॅन्टॉप हिल
मोहम्मद सलीम अब्दुल्ला उर्फ सलीम फ्रुटवाला, नागपाडा
अस्लम पठाणी, डीसीबी बँक बिल्डिंग, डोंगरी
अजय गोसालिया, डिलाईट बिल्डिंग, वांद्रे
कय्युम शेख, माहीम
सोहेल खंडवानी, माहीम

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/nia-raids-in-mumbai-connected-with-dawood-ibrahim-seized-important-evidence-about-mumbai-delhi-violence-plan/articleshow/91482519.cms