मुंबई बातम्या

हॉर्नचा ‘आवाज दाबा’; वाहननिर्मात्यांना आवाहन, भाेंग्यांवरून मुंबई पोलिसांचा पुढाकार – Lokmat

मुंबई : धार्मिक स्थळांवरील  ध्वनिक्षेपकाच्या वापरावरून वाद सुरू असताना, मुंबई पोलिसांनी ध्वनी प्रदूषणावर  नियंत्रण आणण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. तसेच, ऑटोमोबाईल उत्पादकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाहनांच्या हॉर्नची आवाज मर्यादा कमी करण्याची विनंती केली आहे.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वाहनांच्या हॉर्नचा आवाज ९२ ते ११२ डेसिबलच्या श्रेणीत आहे, जो सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत आहे. यासंदर्भात विविध ऑटोमोबाईल उत्पादकांसोबत बैठक घेत त्यांना,  ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी वाहनांच्या हॉर्नचा आवाज कमी करण्यास सांगितल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मुंबई पोलिसांनी यापूर्वी विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे.

यासोबतच सण, उत्सवाच्या काळात जोरजोरात ढोल वाजवणे व डॉल्बी साऊंड सिस्टीमवरून मोठ्या आवाजात गाणी, फटाके वाजवणे यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असते. ध्वनिप्रदूषणामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असतो. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई पोलिसांकडून  प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये ध्वनिप्रदूषणासंदर्भात एका विशेष पोलीस निरीक्षकाची नेमणूक केलेली आहे. 

संबंधित अधिकाऱ्याकडे थेट ध्वनिप्रदूषणाबाबत तक्रार करता येणार आहे. यामध्ये तक्रारदाराची ओळख उघड होणार नाही, याबाबत पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
 
…तर ७ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद
nसर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण संरक्षणाचा कायदा सन १९८६  व ध्वनिप्रदूषण अधिनियम २००० मधील तरतुदींचे सक्त पालन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार रात्री १०  वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊड स्पीकर, फटाके, वाद्ये वाजविण्यास सक्त बंदी केलेली आहे. 

  • सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १०  वाजल्यापर्यंतसुद्धा लाऊड स्पीकर, फटाके, वाद्ये आदींवर मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास ध्वनिप्रदूषणासाठी ५  वर्षे कैदेची किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. 
  • शिक्षा होऊनही गुन्हे सुरू राहिल्यास पुढील प्रत्येक दिवसाला पाच हजार रुपये दंडाची तरतूद आहे.
  • कलम  १५  (१) प्रमाणे शिक्षा होऊन एका वर्षात पुन्हा असे गुन्हे केल्यास ७ वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. याबाबतही पोलिसांकडून जनजागृती करण्यात येत आहे.

कुठे किती, आवाजाची मर्यादा? (डेसिबलमध्ये)

         विभाग     दिवसा      रात्री 
औद्योगिक क्षेत्र      ७५          ७० 
विपणन क्षेत्र         ६५          ५५ 
रहिवासी क्षेत्र        ५५          ४५ 
शांतता विभाग       ५०          ४०  

Web Title: Action Against Drivers Who Play Loud Horns Mumbai Police loudspeaker controversy requests automakers to keep horn low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source: https://www.lokmat.com/maharashtra/action-against-drivers-who-play-loud-horns-mumbai-police-loudspeaker-controversy-requests-automakers-to-keep-horn-low-a720/