मुंबई बातम्या

पालिका शाळांतील मुलांना आर्थिक साक्षरतेचे धडे ; मुंबई शेअर बाजारच्या सहकार्याने उपक्रम – Loksatta

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील गरीब घरांतील विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा भविष्यात आर्थिक स्तर उंचावला जावा, यासाठी ‘आर्थिक साक्षरता मिशन’ अंतर्गत शालेय जीवनातच इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या महानगरपालिका आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इन्स्टिटय़ूट लि. दरम्यान सामंजस्य करार होणार आहे.

सर्वसामान्य गटातील पालकांचा व देशामध्ये मुंबईचा आर्थिक स्तर उंचावला जावा याकरिता ‘आर्थिक साक्षरता मिशन’ अंतर्गत पालिकेने हा उपक्रम आखला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज  इन्स्टिटय़ूट लि. च्या सहकार्याने महानगरपालिकेच्या इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरतेचे धडे देण्याकरिता अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्याची पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन व आर्थिक साक्षरता मिशनचा शुभारंभ देखील सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान होणार आहे.

या कार्यक्रमाला पालिकेचे सहआयुक्त अजीत कुंभार,  बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी  अभिषेक कुमार चौहान, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ( इरए) इन्स्टिटय़ूट लि. चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अंबरीष दत्ता या मान्यवरांसह शिक्षण विभागातील अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहे. 

शिक्षकांना प्रशिक्षण

या अभ्यासक्रमासाठी पालिकेच्या शाळांमधील १०० शिक्षकांना प्रशिक्षित केले जाणार आहे.  या सर्व शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना येत्या जूनमध्ये सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षांपासून आर्थिक साक्षरतेचे धडे मिळणार आहेत.

Source: https://www.loksatta.com/mumbai/financial-literacy-in-bmc-schools-with-the-help-of-bombay-stock-exchange-zws-70-2882127/