मुंबई बातम्या

मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू; गुजरातमध्ये ९७ टक्के भूसंपादन पूर्ण – Maharashtra Times

वृत्तसंस्था, नवी दिल्लीः ‘मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन योजनेवर काम सुरू आहे. त्या अंतर्गत गुजरातमध्ये ९९.७ टक्के भूसंपादन झाले असून, ७५०हून अधिक पिलर उभारण्यात आले आहेत. नर्मदा आणि तापी नद्यांवर पूलही उभारण्यात आले आहेत,’ अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत बुधवारी दिली. रेल्वेचा सध्याचा ताशी १६० किलोमीटर वेग वाढवून तो ताशी २०० किलोमीटर केला जात असल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली. देशातील रेल्वे स्टेशनना आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्यासाठी काम सुरू आहे. या अंतर्गत गांधीनगर आणि भोपाळच्या राणी कमलापति स्टेशनवर प्रायोगिक स्तरावर काम झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘रेल्वेसाठी भरती मोहिमेची गरज नाही’

रेल्वेमध्ये अनुसूचित जाती, जमातींसाठीची रिक्त पदे भरण्यासाठी विशेष भरती मोहिमेची गरज नसल्याचेही वैष्णव यांनी स्पष्ट केले. रेल्वे प्रशासनाकडून ठरावीक कालावधीनंतर नियमितपणे भरती केली जात आहे, त्यामुळे भरतीसाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज नाही, असे वैष्णव म्हणाले. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या भरतीमधील अनुशेष भरून काढण्यासाठी रेल्वेने २००८ मध्ये विशेष भरती मोहीम राबविली होती, अशी माहितीही वैष्णव यांनी दिली.

‘एफडीआय’साठीचे ६६ प्रस्ताव मंजूर

नवी दिल्ली : ‘भारताच्या शेजारील देशांकडून १८ एप्रिल २०२० पासून थेट परकीय गुंतवणुकीसाठी (एफडीआय) ७५,९५१ कोटी रुपयांचे ३४७ प्रस्ताव आले आहेत. यापैकी ६६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे,’ अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी बुधवारी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. मंजूर करण्यात आलेले ६६ प्रस्ताव हे ऑटोमोबाइल, रसायन, कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, फार्मा, शिक्षण, इलेक्ट्रॉनिक, अन्नप्रक्रिया, माहिती आणि प्रसारण, मशिन टूल्स, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, ऊर्जा आणि सेवा क्षेत्रांमधील आहेत.

‘चार विद्यापीठे पूर्णवेळ कुलगुरूविना’

नवी दिल्ली : देशातील चार केंद्रीय विद्यापीठे पूर्ण वेळ कुलगुरूंविनाच सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभास सरकार यांनी लोकसभेत बुधवारी दिली. या विद्यापीठांमध्ये आंध्र प्रदेशातील राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, बिहारमधील महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठ, जम्मू काश्मीरमधील काश्मीर केंद्रीय विद्यापीठ आणि ओडिशातील ओडिशा केंद्रीय विद्यापीठाचा समावेश आहे.

Source: https://maharashtratimes.com/india-news/mumbai-ahmedabad-bullet-train-check-progress-on-indias-first-high-speed-rail-project/articleshow/90281882.cms