मुंबई बातम्या

Heat Wave: अंगाची लाहीलाही होणार! मुंबई, ठाण्यासहीत कोकणात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट – Loksatta

१४, १५, १६ मार्चसाठी जारी करण्यात आलाय उष्णतेच्या लाटेचा इशारा, राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये हा इशारा देण्यात आलाय.

भारतीय हवामान खात्याने वायव्येकडून देशामध्ये येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे कोकण, गोव्यासहीत मुंबईमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिलाय. आकाश निरभ्र राहणार असून आर्द्रता कमी असल्याने उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. पुढील तीन ते चार दिवस नागरिकांनी उन्हात फिरताना अधिक काळजी घ्यावी असं सांगण्यात आलं आहे. यासंदर्भातील पत्रकच हवामान खात्याने जारी केलंय.

नक्की पाहा >> Photos: मुंबई, कोकणासहीत सहा जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा; काय करावे?, काय टाळावे जाणून घ्या

१४, १५, १६ मार्च रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा समान प्रभाव जाणवणार आहे. १४ आणि १५ तारखेला सर्वाधिक जास्त उष्णता असेल तर १६ तारखेला तुलनेने कमी उष्णता असली तरी सतर्क राहण्यास सांगण्यात आलंय. पुढील दोन दिवस म्हणजेच १७ आणि १८ मार्च रोजी वातावरण कोरडं राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. याशिवाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये १४ तारखेला सर्वाधिक उष्णता जाणवेल तर १५ आणि १६ तारखेलाही तुलनेने कमी पण नेहमीपेक्षा अधिक उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्येही इतर जिल्ह्यांप्रमाणे वातावरण पुढील काही दिवस कोरडं असेल, असा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागाचे उप महासंचालक (पश्चिम विभाग) कृष्णानंद होसाळीकर यांनी, “येत्या दोन दिवसांसाठी मुंबईचे कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस इतकं राहील. नंतर हळूहळू हे तापमान कमी होण्याची शक्यता आहे, असं हवामानखात्याचं म्हणणं आहे,” असं ट्विट केलंय. त्याचप्रमाणे त्यांनी, “कृपया घाबरू नका पण काळजी घ्या. किनारपट्टीच्या भागासाठी उष्णतेच्या लाटेचा निकष: कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा साडेचार डिग्री सेल्सिअस वर व कमाल तापमान किमान ३७ डिग्री सेल्सिअस असावे,” असंही म्हटलंय.

कुलाबा येथे रविवारी ३७.६ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे ३८.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. कुलाबा येथे २३.५ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे २२.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. डहाणू येथे रविवारी ३८ अंश सेल्सिअस कमाल आणि २३ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. दोन्हींमध्ये अनुक्रमे सरासरीच्या तुलनेत ७ आणि २ अंशांची वाढ झाली होती.

समुद्र किनारी भागातील जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३७ अंशांच्या वर जाणे हा उष्णतेच्या लाटेसाठी पहिला निकष आहे. सामान्यपणे तापमान ३७ अंशांच्या वर गेल्यानंतर उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला जातो.

Source: https://www.loksatta.com/maharashtra/heat-wave-warning-issued-for-mumbai-thane-by-imd-scsg-91-2840684/