मुंबई बातम्या

मुंबई वातावरण कृती आराखडा अहवाल लोकार्पण सोहळ्यास मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती, म्हणाले… – Loksatta

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई महापालिकेचे केले आहे अभिनंदन

मुंबई वातावरण कृती आराखडा अहवाल लोकार्पण सोहळा आज (रविवार) संपन्न झाला या कार्यक्रमास उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली. तर या कार्यक्रमास पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती. या वेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या ऑनलाईन भाषणात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व मुंबई महापालिकेचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री म्हणाले, ”सर्वप्रथम मी मुंबई महापालिका आणि आपल्या राज्याचा पर्यावरण विभाग म्हणजे आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो. याच कारण म्हणजे हा विषय आपल्या निरोगी जगण्यासाठी जरी आवश्यक असला तरी विकासाच्या दृष्टीने म्हणण्यापेक्षा जगण्याची जी आपली धावपळ सुरू आहे, त्यासाठी ज्या आपल्याला सुविधा लागतात त्या निर्माण करण्यासाठी आपण जी गती वापरतो. त्यावेळी सर्वात जास्त दुर्लक्ष होणारा हा विषय आहे, तो म्हणजे पर्यावरण. साहाजिकच आपल्याला वेळोवेळी अनुभव आलेला आहे की निरोगी जगण्यासाठी एक ज्याला आरोग्यदायी जगण्यासाठी वातावरण हे आलंच. परंतु याबाबत आपण केवळ बोलतच असतो, अनेकदा चर्चा होतात परिसंवाद होतात. आता जस अनेक वक्त्यांनी मत व्यक्त केलं, विषय मांडले. मात्र त्याबाबत काही तरी करण्यासाठी पहिलं पुढाकार घेणंही गरजेचं असतं, यासाठी पहिलं पाऊल टाकणारी ही आपली मुंबई आहे.”

तसेच, ”आजचा जो कृती आराखडा आहे, ज्याला आपण शाश्वत विकास म्हणतो, म्हणजे नेमकं काय तर जस आपण म्हणतो ना सबका साथ सबका विकास आता विकासाच्या पुढे जाताना, विकास हा घाई गर्दीचा नको. विकास हा मूळावरती येणार नको तर तो शाश्वत पाहिजे. शाश्वत म्हणजे काय पर्यावरणास धोका निर्माण न करता, पर्यावरणाची कमीत कमी हानी किंबहून नाहीच, अशी पर्यावरणाची हानी न होऊ देता आपण दीर्घ कालीन टिकणारा असा हा विकास करण्याची आवश्यकता आहे. हा विकास करताना आपल्याला लाभ काय मिळणार आहेत आणि दुष्परिणाम याचा विचार करणं गरजेचं आहे. हा कृती आराखडा हा केवळ कागदावरती न राहता तो कृतीत देखील उतरला पाहिजे.” असंही मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले.

तर, ”ऑगस्ट 2021 मध्ये वचन दिल्याप्रमाणे, शहराकडे आता हवामान कृतीसाठी निर्णायक योजना आहे. सामूहिक अंमलबजावणीसाठी या रणनीतीसह, आम्ही आमचे भविष्य आणि पृथ्वीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.” असं पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

Source: https://www.loksatta.com/mumbai/online-attendance-of-cm-at-mumbai-environment-action-plan-report-dedication-ceremony-msr-87-2839928/