मुंबई बातम्या

आता खरी लढाई मुंबईत होणार, मुंबई भ्रष्ट्राचाऱ्यांपासून मुक्त करणार : देवेंद्र फडणवीस – Zee २४ तास

मुंबई : गोव्याच्या विजयाचं जोरदार सेलिब्रेशन मुंबईत करण्यात आलं. प्रदेश भाजप कार्यालयात फडणवीसांचं जंगी स्वागत केलं. प्रदेश भाजपची सर्व नेतेमंडळी सेलिब्रेशनमध्ये होती. आशिष शेलार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड या नेत्यांनी कार्यकर्त्यांसह नाशिक ढोलाच्या तालावर ठेका धरला.  गोव्यात भाजपने सत्ता राखली आहे. फडणवीस गोव्याचे प्रभारी होते. त्यांनी गोव्यात विजयश्री खेचून आणलीय. मुंबई महापालिका निवडणुकांचं रणशिंगच या शक्तीप्रदर्शनातून भाजप फुंकले आहे.

‘चार राज्यांच्या निवडणुकांनंतर पुन्हा देशाने मोदी यांचा करिष्मा अनुभवला. मोदी है तो मुमकीन है यासाठीच म्हटलं जातं. मोदीजींबद्दल छोट्यातल्या छोट्या व्यक्तीला आदर वाटतं. कालच परवा कॉंग्रेसच्या लोकांनी गोव्याच्या राज्यपालांना पत्र दिलं की, आम्हाला उद्या तीन वाजता बोलवा आम्ही सरकार स्थापन करू. परंतू निकालांनंतर तेथे चिटपाखरूही फडकलं नाही’. अशी मिश्किल टीका देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसवर केली.

‘मी महाराष्ट्रातील भाजपच्या आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांचे विशेष आभार मानतो. चंद्रकांत दादा यांनी जी महाराष्ट्रातून सेना गोव्यात पाठवली. या विजयामध्ये या महाराष्ट्राच्या सेनेचा मोठा फायदा झाला. मी सुरूवातीलाच सांगितलं होतं, की गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची लढाई नोटाशी होती. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीला मिळून जेवढी मते मिळाली त्यापेक्षाही नोटाची मते जास्त होती. 

शिवसेनेने गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात जाऊन घोषणा केली की, आम्ही प्रमोद सावंताना हरवणार.  शिवसेनेचे सर्व नेते तेथे गेले. परंतू तेथे शिवसेनेच्या उमेदवाराला फक्त 97 मतं मिळाली’. अशी टीका फडणवीसांनी केली.

‘या देशातील गरीब, मध्यमवर्गीय आणि महिलांचा आशिवर्वाद भाजपच्या पाठीशी आहे. उत्तरप्रदेशातील भाजपच्या कार्यकर्त्यांचे आणि योगीजींचेही मी अभिनंदन करतो. त्यांनी बुलडोझर चालवत सपा चा सुपडा साफ केला’. असेही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुंबईची मोहिम

आता खरी लढाई तर मुंबईत होणार आहे. आम्हाला मुंबई कोणत्या पक्षापासून मुक्त करायची नाही. तर आम्हाला मुंबईला भ्रष्ट्राचाराच्या विळख्यापासून मुक्त करायचे आहे. मुंबईला भ्रष्ट्रचाऱ्यांच्या विळख्यातून मुक्त केल्याशिवाय आता दम घ्यायचा नाही. चार राज्यांचा विजय आज साजरा करा परंतू उद्यापासून कामाला लागा. मुंबईत प्रचंड विजय आणि महाराष्ट्रात भाजपचं पूर्ण बहुमताचं सरकार तयार करण्याकरीता सज्ज रहावं. अशी विनंती फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केली.

Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/devendra-fadnavis-said-now-target-to-win-mumbai-municipal-corporation-bmc-election-2022/611362