मुंबई बातम्या

Cyclone on Mumbai: मुंबईवर घोंघावू लागले चक्रीवादळाचे संकट; समुद्रात मोठ्या हालचाली – Lokmat

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाढत्या तापमानामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. हे असेच सुरू राहिल्यास आणि समुद्राचे तापमान वाढल्यास मुंबईवरचक्रीवादळाचे संकट गडद होणार आहे, असे अहवालातून समोर आले.

मुंबईच्या समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत राहिली तर २०५० पर्यंत ही पातळीत झालेल्या वाढीमुळे सुमारे पाच हजार कोटी एवढे नुकसान होईल, अशी भीती इंटरगर्व्हन्मेटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या सहाव्या मूल्यांकन अहवालाच्या दुसऱ्या भागात व्यक्त करण्यात आली. २०७० पर्यंत यात २.९ पटीने वाढ होईल, अशी भीती वर्तविण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पात पुराचा धोका कमी करणे आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्यापासून संरक्षण करण्याकडे लक्ष दिले जात असले तरी भरती ओहोटी क्षेत्रातील प्राणी, वनस्पती आणि मासेमारीला धोका पोहचू शकतो. दुसरीकडे मुंबईलगत जागतिक तापमानवाढीसह समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतरच्या चक्रीवादळांत वाढ होईल, अशीही भीती वर्तविण्यात आली आहे.

भविष्यात मुंबईला चक्रीवादळाचे परिणाम अधिक स्पष्टपणे जाणवणार आहेत. मान्सूनपूर्व आणि नंतर दोन्ही चक्रीवादळात वाढ होईल. मुंबई, कोलकाता, चेन्नई या शहरांना वाढत्या समुद्रपातळीचा मोठा धोका आहे.
– डॉ. अंजली प्रकाश, 
संशोधक, भारती इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पॉलिसी

उत्सर्जन कमी करणे गरजेचे
जर उत्सर्जन वेगाने कमी केले नाही तर जागतिक पातळीवर, उष्णता आणि आर्द्रता अशा प्रकारची स्थिती निर्माण करतील जी माणसाच्या सहनशक्तीच्या मर्यादेपलिकडे जाईल. ही असहनशील स्थिती ज्या देशांमध्ये निर्माण होईल, त्यातला एक भारत असेल.

काय आहेत उपाय
n ग्रीन पायाभूत सेवा सुविधा वाढवणे
n शहरी हिरवाईवर अधिक लक्ष केंद्रीत करणे
n कांदळवनांचे संवर्धन करणे
n जैवविविधतेचे संरक्षण करणे
n नद्यांचे संरक्षण करणे

…तर जगणे असह्य
३५ अंश इतक्या वेट – बल्ब तापमानात माणूस सहा तासांहून अधिक काळ तग धरू शकत नाही. मग तो कितीही निरोगी आणि सावलीत आराम करत असला, तरीही तो या हवेत सहा तासांपेक्षा अधिक काळ जगू शकत नाही. यापेक्षा खालच्या पातळीवरदेखील उष्णता असह्य असू शकते, विशेषत: कष्टाचे काम करणाऱ्या तरुण किंवा वृद्धांसाठी ती असह्य ठरू शकते.

कोकणात ढगाळ वातावरण 
७ ते १० मार्च दरम्यान राज्यात काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. ८ आणि ९ मार्च रोजी प्रभाव अधिक राहील. काही ठिकाणी हलका पाऊस अपेक्षित आहे. कोकणात ढगाळ वातावरण राहील.
– कृष्णानंद होसाळीकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय हवामान शास्त्र विभाग

Read in English

Web Title: Hurricane crisis in Mumbai; Big movements in the sea, heat and level of water increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source: https://www.lokmat.com/mumbai/hurricane-crisis-in-mumbai-big-movements-in-the-sea-heat-and-level-of-water-increased-a607/