मुंबई बातम्या

मुंबई बॉम्ब स्फोटातील गुन्हेगारांसह हातमिळवणी करणाऱ्यांवर कारवाई करा! – MahaMTB

भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालय पथकाने (ईडी) कारवाई करत त्यांना अटक केली आहे. मुंबई बॉम्ब स्फोटातील गुन्हेगारांसोबत हातमिळवणी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अटक झाली आहे. या संदर्भात बोलताना भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार श्री. मंगल प्रभात लोढा म्हणाले की, १९९३ रोजी मुंबईत झालेल्या बॉम्ब स्फोटातील गुन्हेगार आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केली असून या संदर्भात त्यांना अटक होणे ही दुर्दैवी बाब आहे. गुन्हेगारांसोबत हातमिळवणी करणाऱ्या आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाऊ नये आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मंगल प्रभात लोढा यांनी केली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्या दहशतवाद्यांनी मुंबई बॉम्बस्फोटात २५७ निष्पाप मुंबईकरांना ठार मारले आणि हजारो लोकांना जखमी केले अश्या गुन्हेगारांसोबत महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांचे संबंध होते. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना देशवासी कधीच माफ करणार नाहीत. हा देशाच्या सुरक्षेशी निगडित मुद्दा आहे, या प्रकरणात सर्व पक्षांनी राजकारण सोडून केंद्रीय यंत्रणांना सहकार्य करावे असे मत मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

 

Source: https://www.mahamtb.com/Encyc/2022/2/24/mangal-prabjhat-lodha-asks-action-against-navab-malik.html