मुंबई बातम्या

मुंबई महानगरातील प्रवासीही दुरावण्याची भीती – Loksatta

विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या संपामुळे मुंबई महानगरातील प्रवाशांचेही हाल होत आहेत.

संपामुळे महानगरातील बसची संख्या नगण्यच

मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या संपामुळे मुंबई महानगरातील प्रवाशांचेही हाल होत आहेत. महानगरात धावणाऱ्या एसटीची संख्या अगदीच नगण्य असून त्यामुळे लोकल, परिवहन बस सेवा आणि खासगी प्रवासी बस सेवांवरच प्रवाशांना अवलंबून राहावे लागत आहे. मुंबई विभागाकडून फक्त दिवसभरात एकच बस, तर ठाणे विभागाकडून पाच ते दहा बस सोडण्यात येत आहेत. गेल्या तीन महिन्यापासून हीच स्थिती असल्याने महानगरातील प्रवासीही दुरावण्याची भीती महामंडळाला आहे.

मुंबई महानगरातून करोनाकाळातही प्रवाशांसाठी २०० हून अधिक एसटी बस सोडण्यात येत होत्या. यामधून दररोज ४० ते ४२ हजार प्रवासी प्रवास करीत होते. संप झाल्याने एसटी सेवा बंद झाली आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी महामंडळाने राज्य शासनाची मंजुरी घेऊन खासगी बस, शालेय बस, अन्य खासगी वाहनांना प्रवासी घेऊन जाण्याची मुभा दिली. गेल्या तीन महिन्यात एसटीची सेवा सुरळीत होऊ शकलेली नाही. त्यामुळे खासगी वाहनांबरोबरच, लोकल आणि परिवहन बसमधून प्रवास करण्याची सवय प्रवाशांना होऊ लागली आहे.

मुंबई ते भिवंडी, उरण ते पनवेल, ठाणे ते बोरिवली, ठाणे ते भिवंडी, भिवंडी ते कल्याण, भिवंडी ते मुंबई, पनवेल ते दादर, ठाणे ते पनवेल, मुंबई ते अलिबाग, मंत्रालय ते पनवेल, दादर ते उरण, कल्याण ते पनवेल यासह अन्य मार्गावरील एसटी बस सेवा पूर्णपणे सुरू होऊ शकलेल्या नाहीत. मुंबई विभागाकडून अवघी एकच बस सोडण्यात येत असून त्याच्या दिवसभरात १० ते बारा फेऱ्या होतात. दिवसभरात या सर्व फेऱ्यांमधून एकूण २०० किंवा त्याहून कमी प्रवासी प्रवास करीत आहेत. तर ठाणे विभागाकडून दररोज ५ ते १० बसच सोडण्यात येत असून त्यातून सरासरी ४२५ प्रवासी प्रवास करतात.

पालघर विभागांर्तगत २८ ते ३० बस

एसटीच्या मुंबई महानगरातील आगारातील कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई झाली असून या विभागांर्तगत मुंबई सेन्ट्रल, परळ, कुर्ला नेहरु नगर, उरण, पनवेल या आगारांचा समावेश आहे. ठाणे विभागात ठाणेमधील वंदना, खोपट, कल्याण, विठ्ठलवाडी, भिवंडी आगार आणि पालघर विभागात पालघर, वसई, नालासोपारा, अर्नाळा आगार आहेत. पालघर विभागांर्तगत दररोज २८ ते ३० बस सोडण्यात येत असून त्याच्या फेऱ्यांमधून एकूण २,२०० प्रवासी प्रवास करीत आहेत. या तीनही विभागांर्तगत होणाऱ्या बस सेवांमधून दररोज अडीच ते तीन हजाराच्या दरम्यानच प्रवासी प्रवास करीत असल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Source: https://www.loksatta.com/mumbai/alienation-commuters-metropolis-strike-buses-metropolis-negligible-ysh-95-2811163/