मुंबई बातम्या

मुंबई विद्यापीठात ‘लता मंगेशकर सेंटर फॉर एक्सलेंस इन लाईट म्यूझिक’ – Maharashtra Times

Lata Mangeshkar Center for Excellence: मुंबई विद्यापीठात (Mumbai University) भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावे सेंटर फॉर एक्सलेंस इन लाईट म्युझिक (Lata Mangeshkar Center for Excellence in Light Music) या प्रगत अभ्यास आणि संशोधन केंद्रांची (advanced study and research centers) स्थापना केली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेत (Management Counsil) घेण्यात आला आहे. त्याचबरोबर विद्यापीठातील संगीत विभागात भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावे चेअरची स्थापन केली जाणार असून लता मंगेशकर यांच्या नावे सुवर्ण पदक बहाल केले जाणार असल्याचाही महत्वपूर्ण ठराव करण्यात आला.

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अजरामर स्वरांमुळे भारतीय नव्हे तर जागतिक संगीत विश्वाला मोठी देणगी लाभली आहे. स्वरांची अद्भूत जादू लाभलेल्या गानकोकीळा लता मंगेशकर यांनी गायलेल्या सुगम संगीतावर अभ्यास आणि संशोधन व्हावे यासाठी या स्वयंअर्थसहाय्यित केंद्राची स्थापना केली जात आहे. या केंद्रांच्या माध्यमातून पदवी, पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि पीएचडीसाठी संशोधन केले जाणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात स्थापन होणाऱ्या एक्सलेंस सेंटरमध्ये यद्ययावत स्डुडिओ, सांगितीक उपकरणे, तांत्रिक सोयी सुविधांनी युक्त असे हे केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. संगीत क्षेत्रात अद्ययावत संशोधनाबरोबरच परदेशी विद्यार्थ्यांनाही भारतीय सुगम संगीत क्षेत्रातील संशोधनाची संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे.

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अजिंक्य स्वरांमुळे संगीत विश्वाला संपन्न करणाऱ्या त्यांच्या अमीट कामगिरीवर शास्त्रोक्त अध्ययन करण्यासाठी संगीत विभागात भारतरत्न लता मंगेशकर चेअरची स्थापन केली जाणार आहे. या चेअरच्या माध्यमातून भारतरत्न लता मंगेशकर यांच्या संगीत विश्वातील कार्यांवर सखोल अध्ययन आणि संशोधन केले जाणार आहे. त्याचबरोबर संगीत विभागात पदव्यूत्तर परीक्षेत प्राविण्य संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांस भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावे सुवर्ण पदक बहाल करून गौरविण्यात येणार आहे.

स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अजरामर स्वरांमुळे संगीत विश्वाला अमूल्य आणि ऐतिहासिक देणगी लाभली आहे. त्यांच्या सांगितीक कार्यकर्तृत्वांचा अजरामर ठेवा पुढील पीढीस प्रेरणा देणारा असल्याची प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी दिली. लता दीदींनी गायलेल्या सुगम संगीतावर प्रगत अभ्यास आणि संशोधन व्हावे यासाठी विद्यापीठात लता मंगेशकर सेंटर फॉर एक्सलेंस इन लाईट म्युझिक सेंटर, त्यांच्या नावे चेअरची स्थापना आणि सुवर्ण पदक बहाल केले जाणार असून गानकोकीळा लता मंगेशकर यांना शैक्षणिक आदरांजली म्हणून विद्यापीठाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

Source: https://maharashtratimes.com/career/career-news/mumbai-university-lata-mangeshkar-center-for-excellence-in-light-music-in-university/articleshow/89433029.cms