मुंबई बातम्या

मुंबई ‘डीआरआय’ संभ्रमात – Maharashtra Times

मुंबई

अमली पदार्थविरोधी कारवाईसह महसूल चोरी पकडणाऱ्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) चर्चगेट परिसरात असलेल्या मुंबई कार्यालय सध्या संभ्रमावस्थेत आहे. या कार्यालयाचे प्रमुख पद असलेल्या राजेश पांडे यांच्याकडे इंदूरचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्याचवेळी एनसीबीमधून ‘डीआरआय’मध्ये आलेले बहुचर्चित अधिकारी समीर वानखेडे हे दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यांची रजेच्या कालावधीतच ‘डीआरआय’मधून अन्य संबंधित कार्यालयात बदली करण्यात आली आहे.

मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने अमली पदार्थांसह अन्य महसूलचोरीच्या घटना येथे मोठ्या प्रमाणात होत असतात. ही चोरी पकडण्याची कारवाई ‘डीआरआय’कडून केली जाते. परंतु वर्षभरापेक्षा अधिक काळापासून ‘डीआरआय’च्या मुंबईतील कारवाया कमी झाल्या आहेत. या कार्यालयात कमी संख्येने असलेले अधिकारी, हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे समोर येत आहे.

याच कार्यालयात आधी समीर वानखेडे हे क्षेत्रीय प्रमुखांतर्गत कार्यरत होते. तेथून ते एनसीबीवर गेले. एनसीबीतून त्यांची बदली १ जानेवारीला पुन्हा ‘डीआरआय’मध्ये क्षेत्रीय प्रमुखांतर्गतच करण्यात आली. पण वानखेडे हे केवळ एक दिवस रुजू झाले. त्यानंतर ते पुन्हा ‘डीआरआय’च्या चर्चगेट येथील कार्यालयाकडे फिरकलेले नाहीत, असे या कार्यालयातील कर्मचारी सांगतात. ते कुठे आहेत, हे सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना माहीत नाही. तर काही जण ते दीर्घ रजेवर असल्याचे सांगतात.

रजेवर असतानाच बदली

‘डीआरआय’ हे केंद्रीय अर्थ मंत्रालयांतर्गत असलेल्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाचा भाग आहे. याच मंडळांतर्गत सीमा शुल्काची चोरी करणाऱ्यांवर देखरेख ठेवणारे विशेष केंद्र मुंबईत कार्यरत आहे. या केंद्राचा ‘डीआरआय’शी कुठलाही संबंध नाही. पण मुंबईत हे केंद्र ‘डीआरआय’ कार्यालयाच्या इमारतीतच आहे. समीर वानखेडे हे १ जानेवारी, २०२२ रोजी ‘डीआरआय’मध्ये रुजू होऊन रजेवर गेले. यादरम्यान त्यांची या विशेष केंद्रात बदली झाली आहे. पण केंद्राचा पदभार कधी स्वीकारणार, यावर कोणीही माहिती देण्यास तयार नाही.

प्रमुखांकडे अतिरिक्त कार्यभार

‘डीआयआर’ची देशभरात जवळपास १२ क्षेत्रीय कार्यालये आहेत. त्यातील एक कार्यालय मुंबईत आहे. या कार्यालयांतर्गत चार प्रादेशिक कार्यालये असून त्यामध्ये मुंबईबाहेरील नागपूर, पुणे व गोव्याचा समावेश होतो. क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुखपद प्रधान अतिरिक्त महासंचालक स्तराच्या अधिकाऱ्यांकडे आहे. सध्या राजेश पांडे यांच्याकडे हा कार्यभार आहे. परंतु पांडे यांच्याकडे इंदूरचाही अतिरिक्त कार्यभार आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/the-mumbai-office-of-the-revenue-intelligence-directorate-in-the-churchgate-area-is-currently-in-disarray/articleshow/89334389.cms