मुंबई बातम्या

भाजपच्या दणक्याने प्रत्यक्षात सादर झाला मुंबई महापालिका अर्थसंकल्प – MahaMTB

मुंबई : मुंबई महापालिकेचा २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प गुरूवार, ३ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला. महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी तो सादर केला. विशेष म्हणजे नेहमी होणाऱ्या सभांप्रमाणे हा अर्थसंकल्प ऑनलाईन स्वरूपात न घेता तो प्रत्यक्षात सादर केला गेला. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ऑनलाईन स्वरूपात होणे हे मुंबईकरांचे दुर्दैव असल्याची टीका भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी केली होती. 

“मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी झालेला आहे. लोकल प्रवासासही मुभा मिळालेली आहे. मुंबईतील शाळाही आता प्रत्यक्ष सुरु झालेल्या आहेत. रुग्णसंख्या हजाराच्या खाली गेलेली आहे. सर्वच निबंध शिथिल झालेले आहेत. मात्र महापालिकेच्या वैधानिक समिती सभा व विशेष सभा अद्यापही व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे होते आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेचा महत्वपूर्ण अर्थसंकल्प सुद्धा ऑनलाईन व्हावी हे मुंबईकरांचे दुर्दैव असल्यासारखे आहे. कोरोना आटोक्यात आल्यानंतरही अद्याप महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने प्रत्यक्ष बैठकांसाठी परिपत्रक न काढणे हि बाब अनाकलनीय आहे. ही ऑनलाईन लपवा छपवी कशासाठी? चर्चा टाळण्यासाठी कि भ्रष्टाचार रेटून पुढे नेण्यासाठी? याचे उत्तर मुंबईकर जनता जनार्दन येत्या निवडणुकीत देईलच. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सभेत कोण सदस्य काय बोलला हे ऐकु येत नाही तसेच प्रतीध्वनी ऐकु येतो. तसेच नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील समस्या मांडता येत नाहीत. कित्येक प्रस्तावांवर बोलण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे आता सदर सर्व बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ऐवजी प्रत्यक्ष घेणे आवश्यक आहे.”, असेही ते पुढे म्हणाले.

  

Source: https://www.mahamtb.com/Encyc/2022/2/3/The-Mumbai-Municipal-Corporation-budget-was-presented-with-the-BJP-s-bang.html