मुंबई बातम्या

सिनेमांच्या प्रसिद्धीचा पडद्यामागाचा नायक – Maharashtra Times

एम. बी. सामंत

सन १९३०चे दशक गाजले ते सिनेमा बोलू लागला यासाठी आणि या बोलक्या सिनेमाने जनमानसात प्रचंड लोकप्रियता मिळवली. सिनेमाच्या लोकप्रियतेमुळे सिनेमा जाहिराती आणि सिनेमाची प्रसिद्धी हा एक नवा उद्योग प्रस्थापित झाला. मुंबईत बी. पी. सामंत आणि कंपनीने आपला जाहिरातीचा व्यवसाय पहिल्या स्थानी नेला. पुण्याची ‘प्रभात’, कोल्हापूरची ‘हंस’या मातब्बर स्टुडिओची प्रसिद्धी बी. पी. सामंत कंपनीकडेच होती. या बी. पी. सामंत कंपनीत एम. बी. सामंत मराठी कॉपीराइटर म्हणून नोकरीला लागले. एम. बी. यांचे हस्ताक्षर सुंदर होते. ते पाहूनच त्यांना बी. पी. सामंत यांनी कॉपीराइटर म्हणून नेमले. त्यांच्यासोबत इंग्रजी कॉपीराइटर म्हणून वसंत साठे यांना नेमले. दोघेही आपआपल्या कामात कुशल होते. एम. बी. सामंत हे नाव मात्र मुंबईच्या जाहिरात क्षेत्रात रूढ झाले.

एम. म्हणजे मधुकर. एम. बी. मूळचे वसईचे. मॅट्रिकची परीक्षा द्यायला प्रथम ते मुंबईत आले. गिरगाव रोडला कुडाळदेशकरांच्या चाळीत नातेवाइकाकडे राहिले. त्याचवेळी चाळीसमोरच्या फूटपाथ पलीकडे मॅजेस्टिक सिनेमागृह होते. तेथे ‘प्रभात’चा ‘अयोध्येचा राजा’ हा चित्रपट प्रकाशित झाला होता. एम. बी. यांचा सिनेमाशी परिचय त्यामुळे झाला. ते १९३२साल होते. त्यानंतर १० वर्षांनी एम. बी. सामंत हे बी. पी. सामंत कंपनीत नोकरीला लागले आणि मुंबईत स्थायिक झाले. एम. बी. यांनी केवळ कॉपीराइटिंग करण्यात धन्यता मानली नाही. बी. पी. सामंत कंपनीच्या कामासाठी ते वारंवार कोल्हापूरला जात असत. तेथे त्यांची ‘हंस’चे बाबूराव पेंढारकर आणि मा. विनायक यांची ओळख झाली. मा. विनायक आणि एम. बी. यांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. मा. विनायक यांच्या एका चित्रपटात एम. बी. यांनी छोटीशी भूमिकाही केली. मा. विनायक यांच्या ओळखीने एम. बी. यांचा कोल्हापूरच्या मराठी चित्रपटसृष्टीशी परिचय झाला.

सन १९५०च्या दरम्यान बी. पी. सामंत यांचे निधन झाले आणि त्यांची कंपनी बंद पडली. एम. बी. यांच्यासमोर नोकरीचा प्रश्न उभा राहिला. पण, तोपर्यंत जाहिरात व्यवसायाचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. त्यांनी वसंत साठे यांना बरोबर घेऊन ‘बॉम्बे पब्लिसिटी सर्व्हिस’ही जाहिरात संस्था सुरू केली. गिरगावात माधवाश्रमाच्या शेजारच्या इमारतीत ऑफिस उघडले. सन १९५०नंतर मुंबईच्या चित्रपट व्यवसायात एक मोठे परिवर्तन आले. ते म्हणजे तोपर्यंत हिंदी चित्रपट व्यवसाय पारशी, गुजराती आणि मराठी लोकांच्या हाती होता. तो हळूहळू सिंधी, पंजाबी लोकांच्या हाती गेला. पारशी, गुजराती लोकांना मराठी भाषा अपरिचित नव्हती. पण सिंधी, पंजाबी यांना अपरिचित होती. हिंदी सिनेमाचे हे बदलते रूप एम. बी. यांनी लगेच ओळखले. बॉम्बे पब्लिसिटी सर्व्हिसमध्ये इंग्रजीतज्ज्ञ वसंत साठे होते. साठे मुक्त इंगजी पत्रकारही होते. हे लक्षात घेऊन एम. बी. यांनी हिंदीतील काम साठे यांच्याकडे सोपविले आणि स्वत: मराठी सिनेमाची प्रसिद्धी पाहू लागले. राजकपूर, देव आनंद, बी. आर. चोप्रा हे हिंदीतले बडे निर्माते बॉम्बे पब्लिसिटीकडे आले. शांतारामबापूंच्या राजकमलची प्रसिद्धीही बॉम्बे पब्लिसिटीकडे आली. तसेच ‘नाझ’सिनेमातील गुलशन राय, शंकर बी. सी. हे हिंदी सिनेमातले बडे वितरक बॉम्बे पब्लिसिटीकडे आले. बी. पी.सामंत कंपनीप्रमाणेच ‘बॉम्बे पब्लिसिटी’सुद्धा सिनेमातील जाहिरातीची नं. १ची कंपनी बनली.

सन १९५०नंतर आणखी एक धक्का मराठी चित्रपट व्यवसायाला बसला. तो म्हणजे, हिंदी सिनेमाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे मराठी सिनेमाचा प्रेक्षक घटला. पुण्याचे प्रभात व नवयुग स्टुडिओ यांना घरघर लागली. सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी थिएटर मिळेना. अशा प्रतिकूल परिस्थितीत एम. बी. यांनी चित्रपट वितरणात उरतण्याचा निर्णय घेतला. राजा ठाकूर पुण्यात तेव्हा ‘मी तुळस तुझ्या अंगणी’हा चित्रपट निर्माण करत होते. शाहू मोडक, हंसा वाडकर, सुलोचना आदींच्या त्यात भूमिका होत्या. ग. दि. माडगूळकरांची पटकथा, गीते होती. पण पैशांअभावी शूटिंग रखडत होते. एम. बी. यांना हे समजले तेव्हा त्यांनी राजाभाऊंना सांगितले पुढचे शुटिंग लावा, मी तुम्हाला वितरण हक्कापोटी भांडवल पुरवितो. ‘मी तुळस तुझ्या अंगणी’तोपर्यंत १० रिळे पूर्ण झाला होता. राजा ठाकूर स्वत: संकलक असल्याने १० रिळे संकलितही झाली होती. एम. बी. यांनी उत्साह देताच राजाभाऊंनी पुढच्या चार रिळांचे शूटिंग लवकरच संपविले. एम. बी. यांना ६० हजार रुपयांत मुंबई-उपनगराचे वितरण हक्क दिले. राजाभाऊंच्या कंपनीचे नाव होते नवचित्र. त्यामुळे एम. बी. यांनी आपल्या वितरण संस्थेचे नांव ‘नवचित्र फिल्म एक्स्चेंज’असे ठेवले आणि सन १९५४मध्ये ‘मी तुळस तुझ्या अंगणी’प्रकाशित झाला. एम. बी. यांच्या कौशल्याने मुंबईचे वितरण उत्तम झाले. एम. बी. यांची वितरण संस्था प्रस्थापित झाली. त्यामुळे इतर निर्माते वितरणासाठी एम. बी. यांच्याकडे येऊ लागले. हिंदी सिनेमामुळे मराठीची आर्थिक घडी विस्कटत होती. त्यामुळे चित्रपट सुरू करायचा आणि वितरकांकडून पुढचे पैसे घेऊन तो पूर्ण करायचा, असा एक नवाच पॅटर्न मराठीत तयार झाला.

या व्यावसायिक संधीचा फायदा एम. बी. यांनी घेतला आणि वर्षाला एक चित्रपट ते वितरणासाठी घेऊ लागले. माधव शिंदे दिग्दर्शित ‘शिकलेली बायको’हा एम. बी. यांनी वितरित केलेला चित्रपट रौप्य महोत्सवी ठरला. सन १९६०मध्ये राजा परांजपे मद्रासच्या ‘ए. व्ही. एम.’साठी ‘बापबेटे’करून पुण्याला परतले. तेव्हा नटवर्य धुमाळ यांनी त्यांची स्वत:ची भूमिका असलेला मराठी चित्रपट काढायचे ठरविले. राजाभाऊंना काम हवे होतेच. पैशाची व्यवस्था कशी करणार असे राजाभाऊंनी विचारताच सुरुवातीचे भांडवल देईन. नंतर वितरकांकडून पैसे घेऊन चित्रपट पुरा करायचा. धुमाळ यांनीच राजा परांजपे यांच्याशी एम. बी. यांची ओळख करून दिली. माडगूळकरांनी दादरच्या तांबे क्लबमधे एम. बी. आणि साठे यांना कथा ऐकविली. त्यांना ती आवडली. चित्रपट झाला ‘जगाच्या पाठीवर’. पण धुमाळ यांना मुख्य भूमिका जी राजाभाऊंनी केली ती मिळालीच नाही. ‘जगाच्या पाठीवर’एम. बी. यांनी मॅजेस्टिकला लावला. ‘जग हे बंदिशाळा’, ‘का हो धरला मजवरी राग’अशी एकापेक्षा एक गीते लोकप्रिय झाली. सुधीर फडके यांचे संगीत प्रेक्षकांना एकदम आवडले. ‘जगाच्या पाठीवर’उत्तम चालला आणि पुढचे राजाभाऊंचे चित्रपट ‘पडछाया’, ‘पाठलाग’वगैरे एम. बी. सामंत यांनीच वितरणाला घेतले. माधव शिंदे यांचे पुढचे चित्रपट वितरणाला घेतले. १०/१२ वर्षे वितरण केल्यावर एम. बी. यांनी निर्मिती करायचे ठरविले. त्यासाठी ‘मधुवसंत चित्र’ही निर्मिती संस्था स्थापन केली आणि ‘मधुचंद्र’निर्माण केला. प्रॉडक्शनचे काम पाहायला त्यांचा मुलगा अरविंद सामंत होताच.राजदत्त यांना ‘मधुचंद्र’चे दिग्दर्शन दिले. त्यांचा हा पहिलाच चित्रपट. ‘मधुचंद्र’अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरला. ते १९६७ साल होते. याच काळात मराठी चित्रपट महामंडळाच्या स्थापनेसाठी विनायक राव सरस्वते, सुधीर फडके यांनी प्रयत्न करायला आरंभ केला. एम. बी. त्यांच्यासोबत होतेच. मराठी सिनेमाला चांगले दिवस यावेत. यासाठी एम. बी. यांनी वितरण, निर्मिती केलीच;पण महामंडळाद्वारे मराठी सिनेमाला सहाय्य करण्यासाठी शासनाकडे प्रयत्न सुरू केले.

एम. बी. यांचे मराठीचे प्रेम वादातीत होते. मा. विनायक यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे आचार्य अत्रे यांनी लिहिलेला ‘ब्रह्मचारी’. एम. बी. यांनी प्रयत्न करून रॉयल फिल्म सर्किटकडून तो विकत घेतला आणि आपल्या वितरण संस्थेमार्फत वितरित केला.एम. बी. मुंबईत राहत असूनही त्यांना हिंदी सिनेमा निर्मिती करावी असे कधी वाटले नाही. मराठी सिनेमा हाच त्यांचा ध्यास आणि श्वास होता. मराठी सिनेमाला १९९५साली महाराष्ट्र सरकारने करमुक्त केले आणि मराठीची हलाखीची अवस्था बदलली. पण ते पाहायला एम. बी. या जगात नव्हते.

Source: https://maharashtratimes.com/editorial/column/kalthase/the-name-m-b-samant-became-commonplace-in-the-mumbai-advertising-industry-/articleshow/89260227.cms