मुंबई बातम्या

नितीन गडकरींचं पत्र येताच मुंबई-गोवा महामार्गावरील आंदोलन स्थगित – Loksatta

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुराववस्थेबाबत रत्नागिरीतील लांजा येथे आंदोलन

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुराववस्थेबाबत रत्नागिरीतील लांजा येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल घेत खासदार विनायक राऊत व मंत्री उदय सामंत यांनी राष्टीय महामार्ग अधिकारी यांच्यासोबत लांजा शहरातील रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. तसंच लांजावासियांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी ग्रासम्थांनी रस्त्याच्या दूरावस्थेबाबत त्यांच्यासमोर व्यथा मांडल्या.

व्यापारी संघटना व लांजावासियांनी एकत्र येऊन लक्ष वेधण्यासाठी लांजा बंद आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनानंतर राष्टीय महामार्ग अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिलं. यामध्ये ३ फेब्रुवारीपर्यत रस्ते सुस्थितीत करण्यात येतील तसंच १० फेब्रुवारीपर्यंत पेव्हर ब्लॉकचे काम पूर्ण करण्याचं सांगण्यात आलं आहे..

दरम्यान आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ९० किलोमीटरच्या रस्त्याचं काम २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल असं पत्र नितीन गडकरी यांनी पाठवलं असून या पत्राचे वाचन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी लांजावासियांच्या समोर केलं. कामाला तात्काळ सुरुवात करण्याचे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले. राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार काम न सुरू केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लांजा ग्रामस्थांनी यावेळी दिला.

गडकरींनी मुंबई-गोवा महामार्गाबाबत आधीही दिली होती आश्वासनं

याआधी नितीन गडकरी यांनी नोव्हेंबर २०२१ ला नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्ग दीड वर्षांत पूर्ण करणार, अशी घोषणा गोव्यात बोलताना केली होती. दक्षिण गोव्यातील वेर्णा येथील कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले होतं की, “मुंबई-गोवा हा महामार्ग गोवा व महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. रस्ता बांधण्यासाठी सुमारे ११ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेl. हा रस्ता पूर्ण झाल्यावर गोवा, कर्नाटक व महाराष्ट्राचा प्रवास सुखद होईल”.

तसंच त्याआधी फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यांनी मार्च २०१९ पर्यंत मुंबई-गोवा हायवेचं विस्तारीकरण पूर्ण करण्यात येईल असं म्हटलं होतं. मुंबईत आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे माझं आश्वासन नाही, पण मार्च २०१९ पर्यंत विस्तारीकरणाचं काम पूर्ण करण्याचा हेतू आहे असं ते म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Source: https://www.loksatta.com/maharashtra/union-minister-nitin-gadkari-letter-to-protestors-on-mumbai-goa-highway-lanja-in-ratnagiri-sgy-87-2778981/