मुंबई बातम्या

मुंबई महापालिकेत स्वबळावर सत्तेचा भाजपचा निर्धार ; मनसेबरोबर युतीच्या चर्चाना पूर्णविराम – Loksatta

सत्ताधाऱ्यांना चारी मुंडय़ा चीत करून भाजपची स्वबळावर सत्ता आणण्याचा निर्धार करण्यात आल्याचे शेलार यांनी सांगितले.

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेशी युती न करण्याचा निर्णय भाजपने घेतला असून स्वबळावर सत्ता मिळविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे शिवसेनेला सत्तेतून खेचण्यासाठी हिंदूुत्वाच्या मुद्दय़ावर भाजप-मनसे संभाव्य युतीच्या गेले काही महिने होत असलेल्या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही हा निर्णय घेण्यात आला आहे.

रिपब्लिकन पक्षासह अन्य काही छोटय़ा पक्षांनी भाजपच्या निवडणूक चिन्हावर लढण्याची अट मान्य केली, तरच त्यांच्यासाठी काही जागा सोडल्या जातील, असे भाजपने ठरविले आहे.

 मुंबईसह अन्य महापालिकांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, प्रभारी अतुल भातखळकर, खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, आमदार अ‍ॅड. आशीष शेलार आदी नेत्यांच्या उपस्थितीत सुमारे चार तास बैठक झाली.

सत्ताधाऱ्यांना चारी मुंडय़ा चीत करून भाजपची स्वबळावर सत्ता आणण्याचा निर्धार करण्यात आल्याचे शेलार यांनी सांगितले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या गेल्या काही महिन्यांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी भेटीगाठी झाल्या होत्या. त्यामुळे भाजप-मनसे संभाव्य युतीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. उभयपक्षी हिंदूुत्वाचा धागा समान असला तरी आणि मराठी माणसाच्या हक्कांचा मुद्दा योग्य असला तरी परप्रांतीयांना विरोध व त्यांचे हक्क डावलण्याची मनसेची भूमिका भाजपला मान्य नव्हती. मनसेने आपली भूमिका बदलली तर विचार होऊ शकतो, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.  मनसेशी युती केल्यास उत्तर प्रदेशात भाजपची अडचण होण्याची भीती होती. त्याचबरोबर मुंबईत मनसेबरोबर जागावाटप करणे भाजपला शक्य वाटत नव्हते. दादर, माहीम, मागाठणे किंवा अन्य मराठी विभागांमधील ३५-४० जागा मनसेला सोडल्यास भाजपची पंचाईत होईल आणि स्वबळावर सत्ता मिळविता येणार नाही. त्यामुळे मनसेशी युती किंवा मोठय़ा प्रमाणावर छुपे साटेलोटेही करू नये, असे मत ज्येष्ठ नेत्यांनी बैठकीत व्यक्त केले आणि तसा निर्णय एकमताने घेण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Source: https://www.loksatta.com/mumbai/bjp-decision-to-contest-mumbai-municipal-corporation-election-alone-zws-70-2777022/