मुंबई बातम्या

Mumbai News : चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू – Maharashtra Times

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

चुकीच्या इंजेक्शनमुळे दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गोवंडीच्या शिवाजीनगरमधून समोर आली आहे. ताह आजम खानअसे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून डिसेंबर महिन्यातही या परिसरात अशाच प्रकारे एका महिलेचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. धक्कादायक म्हणजे लहानग्या ताह याला नर्सिंग होमधील १७ वर्षांच्या सफाई काम करणाऱ्या मुलीने इंजेक्शन दिले होते. याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टर, नर्सिंग होम मालकावसह चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

गोवंडीच्या बैंगनवाडी परिसरातील ताह खान याला उलट्या, जुलाबांचा त्रास होत असल्यामुळे त्याच्या आईवडिलांनी नूर रुग्णालयमध्ये १२ जानेवारीला दाखल केले. दुसऱ्या दिवशी त्याच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणाही झाली. त्याच रुग्णालयात एक १६ वर्षांचा रुग्ण उपचारासाठी दाखल झाला आणि डॉक्टरांनी त्याला औषधे आणि इंजेक्शन कुठले द्यायचे हे निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याला लिहून दिले. या अधिकाऱ्याने नर्सला हे इंजेक्शन देण्यासाठी सांगितले. मात्र हे इंजेक्शन देण्यावरून दोन नर्समध्ये इंजेक्शन वाद झाला. यावेळी एका नर्सने सफाई काम करणाऱ्या मुलीला इंजेक्शन देण्यासाठी सांगितले. या मुलीने १६ वर्षांच्या रुग्णाला इंजेक्शन देण्याऐवजी दोन वर्षांच्या ताह याला दिले. एक इंजेक्शन सलाइनमधून दिले तर दुसरे थेट टोचले. काही वेळातच ताह याचा मृत्यू झाला.

ताह याचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या कुटुंबीयांनी प्रचंड संताप व्यक्त केला. इंजेक्शनचे रिकामे बॉक्स घेऊन नर्सिंग होममध्ये गोंधळ घातला. याबाबतची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस याठिकाणी पोहोचले. त्यांनी कुटुंबीयांची समजूत काढून त्यांची तक्रार दाखल केली. मुलाला टोचलेले इंजेक्शनचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवले असता त्याचा अहवाल गुरुवारी आला. शिवाजीनगर पोलिसांनी रुग्णालयाचे मालक, संचालक, निवासी वैद्यकीय अधिकारी, नर्स आणि सफाई कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-news-death-of-a-two-year-old-boy-due-to-incorrect-injection-in-govandi/articleshow/89029148.cms