मुंबई बातम्या

मुंबई-नवी मुंबई आता मेट्रोने जोडणार? ; ‘एमएमआरडीए’कडे सिडकोचा प्रस्ताव – Loksatta

बेलापूरच्या पुढे दक्षिण नवी मुंबईत सिडको नवी मुंबई मेट्रोचा विकास करीत असून चार मार्ग प्रस्तावित आहेत.

विकास महाडिक, लोकसत्ता

नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात लोकसंख्येच्या तुलनेत झपाटय़ाने विकसित होणारे नवी मुंबई क्षेत्र हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा भाग असल्याने मुंबईत दुसऱ्या टप्यात प्रगतिपथावर असलेला वांद्रे, कुर्ला, मानुखुर्द हा मुंबई मेट्रोचा मार्ग वाढवून तो वाशी, बेलापूपर्यंत जोडण्यात यावा असे साकडे सिडकोने एमएमआरडीएला घातले आहे.

सिडकोने नवी मुंबईच्या दक्षिण भागाला जोडणारे बेलापूर ते पेंदार या नवी मुंबईतील पहिल्या मेट्रो मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आणले असून लवकरच हा मार्ग सुरू होणार आहे. विमानतळ, मेट्रो, रेल्वे, गृह असे महाप्रकल्प उभारताना सिडकोची गंगाजळी आटली असल्याने सिडकोने एमएमआरडीएला ही गळ घातली आहे.

मुंबईत एमएमआरडीएच्या माध्यमातून ३३७ किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे विणले जात आहे. वर्सोवा ते घाटकोपर या पहिल्या मेट्रो मार्गाची मुहूर्तमेढ २००६ रोजी रोवली गेली. या पहिल्या टप्प्यातील मार्गाचा शुभारंभ जून २०१४ रोजी झाला असून इतर ९ मार्गाचे काम जोरदार सुरू आहे. एमएमआरडीएच्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने हा प्रकल्प राबविला जात असून त्याची लांबी वेळोवेळी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे दहिसर या मुंबईच्या शेवटच्या टोकापर्यंत ही सेवा पुरविताना ठाण्यात कासारवडवलीपर्यंतच्या भागाचा विचार केला गेला आहे. आता बेलापूपर्यंतच्या मार्गाचा विचार करण्यात यावा असा प्रस्ताव सिडकोने दिला आहे.

बेलापूरच्या पुढे दक्षिण नवी मुंबईत सिडको नवी मुंबई मेट्रोचा विकास करीत असून चार मार्ग प्रस्तावित आहेत. बेलापूर ते पेंदार या ११ किलोमीटर लांबीच्या मार्गावर सिडकोचे ११ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय २६ किलोमीटर लांबीचे दुसरे तीन मार्ग असून हे मार्ग नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणार आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या आदेशाने सर्वासाठी घर या योजनेसाठी सिडकोने महागृहनिर्मितीचा आराखडा तयार केला असून त्यावर ३२ हजार कोटी रुपये खर्च झालेले आहेत. महागृहनिर्मितीतील घरे उभारण्यासाठी कंत्राटदारांना आगाऊ रक्कम देण्यात आली आहे. याशिवाय विमानतळपूर्व कामे करण्यासाठी सिडकोला तिजोरी रिती करावी लागली असून मेट्रोचे काम पूर्ण करण्याचे आव्हान समोर उभे ठाकले आहे. नेरुळ उरण रेल्वेचे काम मार्गी लावण्यासाठी रेल्वेलाही खर्च द्याावा लागत असल्याने सिडकोची गंगाजळी कमी झालेली आहे. राज्य सरकारने वेळोवेळी केलेल्या सूचनांवरुन सिडको सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून कोविड काळजी केंद्र तसेच समृध्दी व ठाणे खाडीपुलाववरील तिसऱ्या पुलासाठी आर्थिक मदत केलेली आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या उत्तर भागात मेट्रो प्रकल्प उभारण्यास एमएमआरडीएने पुढाकार घ्यावा असे सिडकोने एमएमआरडीए प्रशासनाला सुचविले आहे. मुंबई मेट्रोचा दुसरा टप्पा हा वांद्रे कुर्ला मानखुर्द या तीस किलोमीटर लांबीचा आहे. तो पुढे वाशी, सानपाडा, नेरुळ, बेलापूर असा वाढविता येण्यासारखा असल्याचे सिडकोने म्हंटले आहे.

एमएमआरडीएच्या वतीने मुंबईत मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे. संपूर्ण मुंबई मेट्रोने जोडली जाणार असून रेल्वे उपनगरीय सेवेवरील ताण यामुळे कमी होणार आहे. नवी मुंबई हे झपाटय़ाने वाढणारे शहर असून उत्तम संलग्नतेमुळे काही वर्षांत मुंबई-नवी मुंबई एक झाल्यासारखी दिसणार आहे. त्यामुळे एमएमआरडीएने मेट्रोची सेवा मानखुर्दपुढे नवी मुंबईपर्यंत जोडावी अशी अपेक्षा आहे.

 – संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Source: https://www.loksatta.com/navimumbai/cidcos-proposal-to-mmrda-navi-mumbai-metro-to-connect-mumbai-zws-70-2767209/