मुंबई बातम्या

Mumbai Lockdown: तिसरी लाट अटळ, रुग्णसंख्या २० ते २५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता; मुंबई लॉकडाऊनच्या दिशेने? – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • पुढच्या आठवड्यात करोना रुग्णांची संख्या आणखी वेगाने वाढण्याची शक्यता आहे
  • मुंबईतील रुग्णालयांमध्ये २० ते २५ टक्के रुग्ण दाखल होतील, असा अंदाज आहे
  • त्यामुळे आता मुंबईची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने सुरु झाल्याचे मानले जात आहे

मुंबई: करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने मुंबईत अक्षरश: धुमाकूळ घालायला सुरुवात केल्यामुळे शहरात लवकरच लॉकडाऊन किंवा तत्सम कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता अटळ मानली जात आहे. मुंबईने बुधवारी १५१६६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. पुढच्या आठवड्यात ही संख्या आणखी वेगाने वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा मुंबईतील रुग्णालयांमध्ये २० ते २५ टक्के रुग्ण दाखल होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे आता मुंबईची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने सुरु झाल्याचे मानले जात आहे. राज्य सरकार केवळ कठोर निर्बंध आणू, असे सांगत असले तरी सध्याची परिस्थिती पाहता फक्त निर्बंधांनी परिस्थिती कितपत आटोक्यात येईल, याबाबत शंकाच आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास येत्या तीन ते चार दिवसांत मुंबईत कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आतापर्यंत मुंबईत ४६२ इमारती सील करण्यात आल्या आहेत. तर २० परिसर कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. मुंबईच्या काही भागांमध्ये करोना पॉझिटिव्हिटी रेट हा थेट २५ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. ही एकूणच परिस्थिती धडकी भरवणारी आहे. त्यामुळे येत्या तीन-चार दिवसांमध्ये मुंबईबाबत कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो.
Corona restrictions in Maharashtra : महाराष्ट्रात कठोर निर्बंधांबाबत निर्णयाची शक्यता, अनावश्यक सेवा, लोकल प्रवास, दुकानांच्या वेळा…
करोना वॉरियर्सच आजाराच्या विळख्यात

करोना व्हायरसच्या यापूर्वीच्या दोन्ही लाटा थोपावण्यात मुंबईतील आरोग्य यंत्रणेने मोलाची कामगिरी बजावली होती. परंतु, ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे करोना वॉरियर्स म्हणून ओळखले जाणाऱ्या डॉक्टर्सनाच मोठ्याप्रमाणात आजाराची लागण होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या २३० डॉक्टर्सना करोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये जेजे रुग्णालयातील ५१, लो. टिळक रुग्णालयामध्ये ३५, केईएममध्ये ४०, नायरमध्ये ३५ निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्सच वेगाने बाधित होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

मुंबईत करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ

राज्यात मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ बुधवारीही कायम राहिली आहे. राज्यात आज तब्बल २६ हजार ५३८ नवीन रुग्णांचं निदान झालं आहे. तसंच ८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६.५५ टक्के एवढं झालं आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा झाला आहे. तर मुंबईत बुधवारी १५१६६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. त्यातील १३,१९५ रुग्णांना कोणतीही लक्षणं नाहीत. तर आज १२१८ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/lockdown-in-mumbai-covid-restrictions-in-mumbai-due-to-omicron-coroanvirus-third-wave/articleshow/88727265.cms