मुंबई बातम्या

मुंबई विद्यापीठाचे ऐतिहासिक दीक्षांत सभागृह महाविद्यालयांसाठी खुले – Maharashtra Times

मुंबई: देशातील अग्रगण्य म्हणून समजल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाचा गौरवशाली इतिहास आहे. अलीकडेच विद्यापीठाला ‘नॅक’कडून ए प्लस प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अभूतपूर्व योगदान असणाऱ्या मुंबई विद्यापीठाची ख्याती जगभर व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठाने सतत प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षा राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केली. राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठाचा २०२१ या वर्षाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आला होता. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभानंतर संलग्नित महाविद्यालयांना पदवी वितरण सोहळ्यासाठी विद्यापीठाचे सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृह महाविद्यालयांना दिले जाणार असल्याचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी सांगितले.

याप्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून राज्याचे मा. मंत्री, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार, आदित्य ठाकरे, प्रा. सुनील कुमार सिंह, मा. संचालक, राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्था, गोवा हे लाभले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, कुलसचिव सुधीर पुराणिक, परीक्षा व मूल्यपामन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांच्यासह अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषदेचे मान्यवर सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता यांच्यासोबत विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विभागप्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी डोळ्यांसमोर मोठे लक्ष्य ठेवून त्याच्या यश प्राप्तीसाठी परिश्रम करून विलक्षण असे काही प्राप्त केले तर भारताला जगद्गुरू होता येईल असे सांगताना, विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरीच्या संधी निर्माण करणारे उद्योजक व्हावे असे राज्यपालांनी सांगितले. देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रत्येक स्नातकाला आत्मनिर्भर व्हावे लागेल असे त्यांनी सांगितले. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आंतरशाखीय अध्ययन व अकॅडेमिक क्रेडिट्स देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना विविध शाखांमधील विषय देखील शिकता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेचे संचालक प्रा. सुनील कुमार सिंह म्हणाले की, शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रीया आहे. शिक्षणामुळे सर्वांगिण विकास तर होतोच पण त्याबरोबर मिळणारा आनंद हा आयुष्यभराची संपत्ती म्हणूनही सोबत असतो. शिक्षण या प्रक्रीयेत शिक्षकांचा मोठा वाटा असतो. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत त्यांची भूमिका मोलाची असते. विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, या जगात वावरतांना जीवघेण्या स्पर्धेला बळी पडू नका. जे मनापासून आवडते त्यावर अधिक भर देऊन आणि स्वतःवर विश्वास ठेऊन मार्गक्रमन करण्याचा सल्ला त्यांनी याप्रसंगी दिला.

याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी विद्यापीठ अहवालाचे वाचन करत विद्यापीठाने मागील वर्षभरात केलल्या उल्लेखनीय कामगिरीचा उल्लेख केला. यामध्ये विद्यापीठाने अनेक नाविण्यपूर्ण हाती घेतले असून यामध्ये सिंधुदुर्ग उपपरिसराची स्थापना, विविध ज्ञानशाखांच्या एकत्रीकरणासाठीची स्कूल संकल्पना, आंतरराष्ट्रीय संबध आणि सामरिक अध्ययन केंद्र, सागरी अध्ययन केंद्र, विविध अध्यासन केंद्र, संसर्गजन्य रोग निदान प्रयोग शाळा, मेंदू वर्तवणूक प्रयोगशाळा, लघु संशोधनासाठी आर्थिक सहाय्य, राष्ट्रीय शैक्षणिक डिपोझिटरी कक्षाच्या स्थापनेअंतर्गत १२.४५ लाख पदवी प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध करून देत विविध विभागांचे उपक्रम, योगदान, संशोधन आणि प्रकाशने याबाबतची तपशीलवार माहिती त्यांनी त्यांच्या अहवालात सांगितली.

सध्याच्या साथीच्या आजाराने उभ्या ठाकलेल्या आव्हानांना सामोरे जाऊन सर्वांच्या सहकार्याने विद्यापीठाला उज्वल भविष्याकडे घेऊन जाण्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. विशेष बाब म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभानंतर संलग्नित महाविद्यालयांना पदवी वितरण सोहळ्यासाठी विद्यापीठाचे सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृह महाविद्यालयांना दिले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

MU Convocation 2021: दोन लाखांवर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
imageअभ्यास तोंडपाठ, लेखनात सपाट! ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या लेखनक्षमतेवर परिणाम
imageदहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, बोर्ड परीक्षेसाठी अधिक वेळ मिळणार

Source: https://maharashtratimes.com/career/career-news/mumbai-university-convocation-hall-will-be-hereafter-available-to-colleges-to-conferred-degrees/articleshow/88543644.cms