मुंबई बातम्या

ओमिक्रॉनचा धोका वाढतोय! मुंबई महापालिकेची नियमावली जाहीर|Omicron – Sakal

मुंबई
sakal_logo

By

मुंबई : सध्या देशात ओमिक्रॉनच्या रुग्णांची (India Omicron Cases) संख्या वाढत असून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. तसेच मुंबईत देखील ओमिक्रॉनचे रुग्ण (Mumbai Omicron Cases) वाढत असून महापालिका (BMC) सतर्क झाली आहे. मुंबईत ३१ डिसेंबरपर्यंत कलम १४४ म्हणजेच जमावबंदीचे आदेश यापूर्वीच लावण्यात आले होते. आता महापालिकेने आणखी नियमावली जारी केली आहे.

हेही वाचा: ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यास भारत सज्ज मनसुख: मंडाविया

येत्या ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर होणारे कार्यक्रम पाहता महापालिकेने निर्बंध कठोर केले आहेत. मोकळ्या जागांवर होणाऱ्या कार्यक्रमांवर कठोर निर्बंध लादले असून फक्त २०० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. बॅन्केट हॉल, बंदीस्त सभागृहात जागेच्या क्षमतेपेक्षा केवळ ५० टक्के मर्यादेपर्यंत प्रवेश देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मोकळ्या जागांवर क्षमतेच्या २५ टक्के लोकांना जमण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच कोणत्याही कार्यक्रमात दोन व्यक्तींमध्ये ६ बाय ६ चे सोशल डिस्टन्स ठेवणे बंधनकारक आहे, असं महापालिकेच्या नियमावलीमध्ये म्हटलं आहे.

देशात आतापर्यंत ओमिक्रॉनचे २०० रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ५४ रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. तसेच धारावीसारख्या दाटीवाटीच्या वस्तीत देखील ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेची चिंता आणखी वाढली आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे निर्बंध लादण्यात आले आहेत. यापूर्वी जाहीर केलेल्या आदेशामध्ये पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच दुकाने, आस्थापना आणि सर्व सार्वजनिक वाहनाने वाहतूक करण्याची परवानगी आहे. याशिवाय कोणत्याही कार्यक्रमात लशीचे दोन्ही डोस झालेल्या नागरिकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता महापालिकेने जारी केलेल्या नियमावलीमुळे ३१ डिसेंबरला मुंबईत रंगणाऱ्या पार्ट्यांवर निर्बंध आले आहेत. तसेच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक असलेल्या तरुणाईचा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.

Source: https://www.esakal.com/mumbai/bmc-announced-rules-for-people-due-to-omicron-cases-in-mumbai-bsr95