मुंबई बातम्या

Omicron Variant in Mumbai : ओमायक्रॉनशी दोन हात करण्यासाठी मुंबई कितपत सज्ज? – ABP Majha

Omicron Variant in Mumbai : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं देशासह राज्याचीही चिंता वाढवली आहे. सध्या राज्यात 8 ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रशासन सज्ज झालं असून तयारी करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना ओमायक्रॉनचं संकट (Omicron Variant) आपण रोखू असंही महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. तसेच मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी (Suresh Kakani) यांनी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर 15 डिसेंबर आधी पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल. शेवटच्या 4-5 दिवसांत पुन्हा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असं म्हटलं आहे. 

महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “आजही कोरोना संपलेला नाही. त्यात आता ओमायक्रॉन आला आहे. मुंबईत ओमायक्रोनचा रुग्ण अजूनही आढळलेला नाही. मुंबई सर्वांच्यात आहे, इकडे अनेकजण कामाला येत असतात. त्यामुळे तो प्रादुर्भाव वाढू नये याची काळजी घेत आहोत. आपण लसीकरण मोठ्या प्रमाणात करत आहोत. सर्व नियम येत असतात. नियमांचे पालनही मुंबईकर करत आहेत. हे संकट आपण रोखू. आताच्या घडीला मिळालेला रुग्ण सौम्य लक्षणं असलेला आहे.” 

पाहा व्हिडीओ : मुंबई-पुण्याची धाकधूक वाढवणारी बातमी, महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे 8 रुग्ण

[embedded content]

“इतर देशात लहान मुलं सर्वाधिक बाधित आहेत. प्रत्येकाने मागे जे मुख्यमंत्र्यांनी सांगितले ते पाळले पाहिजे. जे मास्क वापरत नाही, त्यांच्यासाठी मार्शल आहेत. मी मास्क वापरणार नाही, असं म्हणून तुम्ही धोक्यात जाऊ नका. आमची सर्व यंत्रणा सज्ज आहे. जर रोज 2 हजार इतर देशातून पॅसेंजर आले तर लोड वाढत आहेत. पण आम्ही तयार ठेवली आहे.”, असंही महापौर म्हणाल्या. “शाळांबाबत अजुनही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वाट बघा. आपण तिसऱ्या लाटेला थोपवू. लॉकडाऊन वैगरेची चर्चा नाही.”, असंही महापौरांनी स्पष्ट केलं. 

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर 15 डिसेंबरआधी पुन्हा एकदा आढावा बैठक : सुरेश ककाणी (Suresh Kakani)

अतिरीक्त आयुक्त सुरेश ककाणी बोलताना म्हणाले की, “ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर एअरपोर्टवर रिस्क कंट्रीमधील प्रवाशांचं टेस्टींग होतंय. हेल्थ पोस्ट, वॉर्ड रुम यांच्याकडून नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. रेल्वे स्टेशनवर स्क्रीनींग, रॅपीड टेस्ट केल्या जात आहेत. तसेच महापालिकेकडून विनामुल्य सेवेकरता कोविड सेंटर राखून ठेवले आहेत. मुंबईत 30 हजार बेड तयार असून सध्या 15 हजार बेड अॅक्टीव्ह आहेत. सध्या रुग्णसंख्या कमी असली तरीही ऑक्सिजन, औषधं, बेड यांची तयारी पूर्ण आहे. 1500 बेड लहान मुलांसाठी तयार केले आहेत. लहान मुलांकरता विशेष ऑक्सिजन मास्क,  व्हेंटीलेटर यांचीही तयारीही केलीय. मुंबईत 19 पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. मात्र, जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल बाकी असून उद्यापासून हे रिपोर्ट यायला सुरुवात होईल.” तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, “ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर 15 डिसेंबर आधी पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल. शेवटच्या 4-5 दिवसांत पुन्हा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल.” 

5 राज्य, 21 रुग्ण; लसवंतांनाही संसर्ग, देशात वाढतोय ओमायक्रॉन

जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं धाकधुक वाढवली आहे. अशातच आता या व्हेरियंटनं भारतातही प्रवेश केला आहे. जगभरातील एकूण 38 देशांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाल्याची माहिती मिळत आहे. भारतातही आता ओमायक्रॉन आपले हातपाय पसरताना दिसत आहे. केवळ चारच दिवसात भारतात ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 21 वर पोहोचली आहे. 2 डिसेंबर रोजी देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तर 6 डिसेंबरपर्यंत या व्हेरियंटची संख्या 21 वर पोहोचली आहे. 

रविवारी एका दिवसात ओमायक्रॉनचे नवे 17 रुग्ण देशात आढळून आले. राजस्थानच्या जयपूरमध्ये 9, महाराष्ट्रात 7 आणि राजधानी दिल्लीमध्ये 1 या रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरियंट राजधानी दिल्लीसह 5 राज्यात फैलावला आहे. अशातच देशातील एकूण ओमायक्रॉनची संख्या 21 वर पोहोचली आहे. सर्वाधिक 9 रुग्ण राजस्थानमध्ये आहे, तर 8 रुग्ण महाराष्ट्रात, 2 रुग्ण कर्नाटकात, तर दिल्ली आणि गुजरातमध्ये प्रत्येकी 1-1 रुग्ण आहे.  

महाराष्ट्रात ओमायक्रॉन रुग्णाची संख्या 8 वर

शनिवारी डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा एक रुग्ण आढळला होता. यामध्ये आता पुण्यातील 7 रुग्णांची भर पडली आहे. रविवारी पिंपरी चिंचवडमधील 6 तर पुण्यात एका रुग्णाची भर पडली आहे. पिंपरी चिंचवडमधील एकाच कुटुंबातील सहा जणांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. नायजेरियातून भावाला भेटण्यासाठी आलेल्या 44 वर्षीय महिलेला, तिच्यासोबत आलेल्य दोन मुलींना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्याशिवाय त्या महिलेचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुलींनाही ओमायक्रॉनची लागण झाली आहे. सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून पिंपरी-चिंचवडमधील जिजामाता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या सहा रुग्णापैकी तीन जण 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.

Source: https://marathi.abplive.com/news/mumbai/omicron-variant-in-mumbai-how-ready-is-mumbai-to-bring-omaicron-under-control-1016607