मुंबई बातम्या

मुंबई पोलीस भरतीसाठी सुधारित ‘कट ऑफ’ जाहीर ; आरक्षित वर्गातील शेकडो उमेदवारांना लाभ – Loksatta

मुंबई पोलीस शिपाई भरतीकरिता १४ नोव्हेंबरला अकराशे जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती.

देवेश गोंडाणे, लोकसत्ता

नागपूर : मुंबई पोलीस शिपाई भरती-२०१९ मध्ये सामाजिक व समांतर आरक्षणाच्या नियमाला बगल देत ‘कट ऑफ’ जाहीर करण्यात आला होता. यासंदर्भात ‘लोकसत्ता’मधील वृत्ताची दखल घेत पोलीस विभागाने सुधारित ‘कट ऑफ’ जाहीर केला आहे. सुधारित ‘कट ऑफ’नुसार ज्या उमेदवारांना शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात आले नसल्यास त्यांनी ६ ते ८ डिसेंबरदरम्यान लेखी निवेदन सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यामुळे आरक्षित वर्गातील अनेक उमेदवारांना संधी मिळणार आहे.

मुंबई पोलीस शिपाई भरतीकरिता १४ नोव्हेंबरला अकराशे जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर उत्तरतालिकेवरील हरकतींचे समाधान करून २६ नोव्हेंबरला सदर लेखी परीक्षेची सामाजिक व समांतर आरक्षणनिहाय १:१० प्रमाणातील पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्याचे पोलीस विभागाने त्यांच्या पत्रात सांगितले आहे.

मात्र, या यादीत खुल्या प्रवर्गाचा ‘कट ऑफ’ (७७) हा आरक्षित प्रवर्गापेक्षा कमी होता. त्यामुळे या भरती प्रक्रियेत समांतर आरक्षणाच्या नियमाला बगल देण्यात आल्याने आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांचे नुकसान होणार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर पोलीस विभागातील निवड समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत एका सदस्याने भरती प्रक्रियेमधील ‘कट ऑफ’वर आक्षेप घेतला. त्यामुळे निवड समितीने यासंदर्भात राज्य शासनाला मार्गदर्शन मागितले होते. यानंतर ४ डिसेंबरला पोलीस शिपाई भरतीचा सुधारित ‘कट ऑफ’ जाहीर करण्यात आला आहे. या ‘कट ऑफ’मधील संबंधित उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी, शारीरिक मोजमाप चाचणी या प्रक्रियेसाठी बोलावण्यात आले आहे. जर, या ‘कट ऑफ’प्रमाणे एखाद्या उमेदवाराला बोलवण्यात आले नसल्यास त्याने ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत पोलीस मुख्यालय, संकुल हॉलच्या बाजूला, नायगाव, दादर पूर्व, मुंबई येथे भेटून लेखी निवेदन सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सुधारित यादीवरही आक्षेप

पोलीस विभागाने सुधारित ‘कट ऑफ’ जाहीर केला असला तरी यामध्ये आरक्षित वर्गाचा ‘कट ऑफ’ कमी करून तो खुल्या वर्गाएवढा म्हणजे ७७ करण्यात आला आहे. समांतर आरक्षणाचा नियम लागू केल्यास नैसर्गिकरीत्या खुल्या वर्गाचा ‘कट ऑफ’ हा आरक्षित वर्गापेक्षा अधिक राहायला हवा. मात्र, पोलीस विभागाने सुधारित ‘कट ऑफ’ ठरवताना कुठले निकष लावले हे कळायला मार्ग नाही, असा आक्षेप विद्यार्थी कार्यकर्ता उमेश कोर्राम यांनी घेतला आहे.

पोलीस भरती प्रक्रिया सुरळीत व आरक्षणाच्या नियमानुसारच सुरू आहे. केवळ कट ऑफदाखवण्यात थोडा गोंधळ उडाला होता. त्यामुळे केवळ त्याचा सुधारित तक्ता जाहीर करण्यात आला आहे. आधीच्या यादीमध्येही आरक्षित गटातील सर्वच उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे.

राजकुमार वटकर, सहपोलीस आयुक्त (प्रशासन) मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Source: https://www.loksatta.com/maharashtra/revised-cut-off-list-for-mumbai-police-recruitment-announced-zws-70-2707449/