मुंबई बातम्या

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, बहीणच पाहुणचारास आल्याचं वाटलं; राऊतांचं ‘रोखठोक’ मत – Lokmat

Sanjay Raut On Mamata Banerjee : प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी पत्रकारांसमोर नारा दिला, ‘जय बांगला, जय मराठा!’ प. बंगालच्या वाघिणीची ही गर्जना भविष्यातील राजकारणाची नांदी आहे, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

मुंबईत येऊन त्यांना उद्धव ठाकरे यांना भेटायचे होते. ती भेट मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आजारपणामुळे झाली नाही. ममता बॅनर्जी यांनी प. बंगालात जो ‘खेला होबे’ केला, दिल्लीचा अतिरेक रोखण्याचा, तोच खेळ महाराष्ट्रात झाला. सत्ता, पैसा व केंद्रीय तपास यंत्रणांचा प्रचंड दहशतवाद याचा पराभव प. बंगाल आणि महाराष्ट्राने केला. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा होता. एका राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या दौऱ्यावर जातात तेव्हा फार स्वागत होत नाही. ममता बॅनर्जी त्यास अपवाद आहेत. प. बंगालातून जणू बहीणच दोन दिवसांसाठी पाहुणचारास आली, असे मुंबईकरांना वाटले, असे राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याचं कौतुक केलं.

नातं टिकलं पाहिजे
महाराष्ट्र मंडळात आमच्या नियमित बैठका होत असतात. प. बंगालचे महाराष्ट्राशी नाते कायम टिकले पाहिजे!’’ असा आशावाद ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला. आदित्य ठाकरेंबरोबर दिल्लीत ममता बॅनर्जी यांना भेटण्याचा योग अनेकदा येतो. मुंबईच्या ‘ट्रायडेण्ट’ हॉटेलात  आदित्य ठाकरे यांच्या सोबतीने त्यांना भेटलो. ममता मुंबईतील उद्योगपतींना भेटण्यासाठी आल्या. उद्योगपतींनी प. बंगालात यावे हे निमंत्रण घेऊन त्या आल्या. त्यांनी उद्योगपतींची बैठक विनम्रपणे बोलावली. तेव्हा गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या मुंबई दौऱ्याची आठवण झाल्याचे ते म्हणाले.

… त्या राज्यांचा विकास तात्पुरती सूज  
मुंबईतील उद्योगपतींना गुजरातेत येण्याचे निमंत्रण घेऊन त्या आल्या व मुंबईत येऊन मुंबईचीच बदनामी करून गेल्या. ‘‘मुंबई में क्या रखा है? इथले रस्तेही खराब आहेत. तेव्हा गुजरातला चला.’’ असे निमंत्रण त्यांनी दिले. तेव्हा महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. ममता बॅनर्जी यांनी मुंबईतील विकासाचे उद्योगपतींकडे कौतुक केले व प. बंगालकडे दृष्टी वळवा, असे सांगितले. शेवटी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, पण महाराष्ट्राचीही ती राजधानी आहे. याचे भान ठेवून जे राज्यकर्ते मुंबईत उतरतात त्यांचे स्वागत आहेच. देशाचा आर्थिक भार मुंबईच्या डोक्यावर आहे. मुंबईला ओरबाडून ज्यांना आपली राज्ये विकसित करायची आहेत त्या राज्यांचा विकास म्हणजे तात्पुरती सूज आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राच्या राजधानीने हातभार लावला तर ते राष्ट्रीय कार्यच ठरेल, असेही राऊत यांनी आपल्या सदरात नमूद केले.

ईडीचे लोक कोलकात्यात बसून
ममता बॅनर्जी यांनी बंगालात प्रचंड विजय मिळवला. भारतीय जनता पक्षाची सत्ता व मत्ता यांचा दारुण पराभव केला. एखाद्या वाघिणीसारख्याच त्या लढल्या. केंद्रातले मोदींचे सरकार कसे छळवाद करीत आहे व बंगालचे सरकार व जनता या छळवादाशी कसे नेटाने लढत आहे ते त्यांनी सांगितले. प. बंगालचे राज्यपाल रोजच अडवणुकीचे धोरण स्वीकारतात. ‘ईडी’चे पन्नास लोक कोलकात्यात बसवून ठेवले आहेत व ते मंत्री, आमदारांवर खोटे गुन्हे दाखल करतात. प. बंगालची यथेच्छ बदनामी भाजप व केंद्रीय यंत्रणा करतात, पण महाराष्ट्राप्रमाणेच बंगाल झुकणार नाही. मराठा व बंगाली हे लढणारे लोक आहेत. ते मागे हटणार नाहीत, असे बॅनर्जी म्हणाल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: Mamata’s Mumbai tour makes Maharashtra happy; I thought my sister was the guest, Raut’s ‘cash’ opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source: https://www.lokmat.com/maharashtra/mamatas-mumbai-tour-makes-maharashtra-happy-i-thought-my-sister-was-guest-rauts-cash-opinion-a720/