मुंबई बातम्या

वर्षाअखेरीस अधिक सावधगिरी; मुंबई महापालिकेनं घेतला ‘हा’ निर्णय – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः करोना रुग्णसंख्या कमी होत असताना पालिका प्रशासनाने डिसेंबर महिन्याच्या अखेरीसही चाचण्या करण्याचा वेग कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन, शिथिल झालेले निर्बंध, डिसेंबरमध्ये बाहेरील देशांमधून मुंबईत येणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन अधिक सावध पवित्रा घेण्यात येणार आहे.

करोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता आता सौम्य झाली आहे. दिवाळीनंतर ज्या संख्येने रुग्णसंख्येमध्ये वाढ अपेक्षित होती तितकी ती झालेली नाही. तरीही पुढील पंधरा दिवस अधिक महत्त्वाचे आहेत. या दिवसांमध्ये रुग्णसंख्या कशी वाढते, संसर्गित झालेल्या व्यक्तींमध्ये करोना संसर्गाचा कोणत्या स्वरूपाचा विषाणू दिसून येतो, परावर्तित स्वरूपाच्या विषाणूचे स्वरूप कसे आहे, त्याची संसर्ग करण्याची क्षमता किती आहे या प्रत्येक सूक्ष्म मुद्द्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

करोना रुग्णांच्या चाचण्या योग्य वेळी झाल्या पाहिजेत हा आग्रह कायम होता. यापुढेही तो राहणार आहे. संसर्गाचा जोर ओसरला असला तरीही पुढील काही दिवस रुग्णसंख्येकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे. राज्यात आता पर्यटन तसेच इतर वैयक्तिक कामाच्या निमित्तानेही वर्दळ सुरू झाली आहे. ये-जा वाढल्यामुळे रुग्णसंख्येत काही वाढ होते का हे पाहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

करोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे यावर्षी दिवाळीचा उत्साह तुलनेने अधिक होता. या वर्षाला निरोप देत असताना तसेच नव्या वर्षाचे स्वागत करताना हाच उत्साह मुंबईकरामध्ये असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यामध्येही संसर्ग कोणत्याही प्रकारे वाढू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

लसीकरणामुळे नियंत्रण शक्य

लसीकरणामुळे करोना संसर्गावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. ज्यांनी दुसरी मात्रा अद्याप घेतलेली नाही त्या रुग्णांनी ही मात्रा घ्यावी यासाठी प्रभागनिहाय जनजागृती करण्यात येणार आहे. दोन्ही मात्रा घेतल्यानंतर करोना संसर्ग झाल्यास त्याची तीव्रता तुलनेने कमी असेल याकडेही वैद्यकीय तज्ज्ञांनी वारंवार लक्ष वेधले आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-ahead-of-christmas-bmc-directs-ward-officers-to-increase-covid-19-testing-across-city/articleshow/87791436.cms