मुंबई बातम्या

मुंबई विद्यापीठाच्या 12 लाख पदव्या आता डीजीलॉकरवर – Lokmat

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाने भारतातील सर्व शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांची  शैक्षणिक प्रमाणपत्रे नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरीच्या (एनएडी) माध्यमातून डीजीलॉकरमध्ये ठेवण्याचे निर्देश दिले होते. डीजीलॉकरवर पदवी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात महाराष्ट्रात मुंबई विद्यापीठ प्रथम स्थानावर आहे. महाराष्ट्रातील डीजीलॉकरवर असलेल्या एकूण पदव्यांपैकी ५० टक्के पदव्या मुंबई विद्यापीठाच्या आहेत.

मुंबई विद्यापीठाने पहिल्या टप्प्यात वर्ष २०१४ ते २०२० या सात वर्षांतील १२ लाख ४३ हजार ५३४ पदवी प्रमाणपत्रे  डीजीलॉकरवर उपलब्ध करून दिली आहेत, तर महाराष्ट्रामध्ये एकूण पाच विद्यापीठांची  २४ लाख ८८ हजार ७२२ पदवी प्रमाणपत्रे  डीजीलॉकरवर उपलब्ध आहेत. दुसऱ्या टप्प्यात मागील पाच वर्षांतील ५ लाखांपेक्षा जास्त पदवी प्रमाणपत्रे  डीजीलॉकरवर उपलब्ध केली जाणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी दिली. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील केंद्रीय संगणक सुविधा कक्षाचे वरिष्ठ यंत्रणा प्रोग्रामर डॉ. प्रवीण  शिनकर हे नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरीचे मुंबई विद्यापीठाचे नोडल ऑफिसर म्हणून कार्य करीत आहेत.

डीजीलॉकरवर अशी प्राप्त करा पदवी 
विद्यार्थ्यांनी https://www. digilocker.gov.in/dashboard या संकेतस्थळाला जाऊन आपले आधार कार्ड व मोबाइल फोन क्रमांकाच्या आधारे अकाउंट उघडावे. त्यात मुंबई युनिव्हर्सिटी हा शब्द टाकावा. यानंतर शेवटच्या सत्राचा रोल क्रमांक किंवा आसन क्रमांक टाकावा. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेवर असलेले संपूर्ण नाव लिहावे, तसेच परीक्षेचे वर्ष टाकावे, यानंतर विद्यार्थ्यास त्याचे पदवी प्रमाणपत्र दिसते.

२०२० च्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे विद्यार्थ्यांसाठी अनेक बाबी संकेतस्थळावर ठेवणे आवश्यक आहे. यानुसार मुंबई विद्यापीठाने पावले टाकली आहेत, पदवी प्रमाणपत्रे डीजीलॉकरवर उपलब्ध करून देणे हा याचाच एक भाग आहे.
– डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

Web Title: 12 lakh degrees of Mumbai University now on Digilocker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source: https://www.lokmat.com/mumbai/12-lakh-degrees-mumbai-university-now-digilocker-a607/