मुंबई बातम्या

खरेदीला उत्साहाचे उधाण..; दिवाळीनिमित्त मुंबई ठाण्यासह राज्यभरातील बाजारपेठांमध्ये गजबज – Loksatta

मुंबईतील महत्त्वाच्या बाजारपेठांसह उपनगरांतील खरेदीगल्ल्यांमध्ये नागरिकांची झुंबड उडाली होती.

दिवाळीनिमित्त मुंबई ठाण्यासह राज्यभरातील बाजारपेठांमध्ये गजबज

मुंबई, नागपूर, पुणे : गेल्या वर्षी करोनामुळे दिवाळीचा आनंद क्षीणक्षीण झालेला पाहायला मिळाला. त्या वाया गेलेल्या वर्षाची भरपाई करणारा सणउत्साह राज्यात सप्ताहअंती सर्वत्र दिसला. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि नाशिकसह सर्वच शहरगावांतील बाजारपेठा  शनिवारी तुडुंब भरल्या. कपड्यांपासून आकाश कंदीलांपर्यंत आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून दागिन्यांच्या खरेदीसाठी नागरिकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. दीड वर्षानंतर मोठी खरेदी होत असल्याने व्यापारी वर्गातही आनंदाचे वातावरण आहे.

मुंबईतील महत्त्वाच्या बाजारपेठांसह उपनगरांतील खरेदीगल्ल्यांमध्ये नागरिकांची झुंबड उडाली होती. दुपारनंतर बाजारपेठा गजबजल्या. एरव्ही संध्याकाळी कार्यालयातून घरी परतणारा नोकरदारवर्ग दुपारीच बाजारपेठेत दाखल झाला. रांगोळ्या, रंग, छाप, तोरण, फुले, माळा, सजावटीच्या वस्तू, कपडे विक्रेत्यांभोवती ग्राहकांचा गराडा होता. साड्यांची दुकाने महिला वर्गाने भरून गेली होती.  ग्राहक वाढल्याने बाजाराला लागून असलेल्या खाऊगल्ल्यांचाही थाट वाढला होता. दादर कबुरतरखाना, स्थानक परिसर, किर्तीकर मंडई आणि आसपासच्या गल्ल्या ग्राहकांच्या खरेदीत दंग झाल्या होत्या.  ग्राहकांच्या गर्दीमुळे दुकानदारांची तारांबळ उडाली होती. हिंदमाता, लालबाग, क्रॉफर्ड मार्केटमध्ये रिकामा रस्ताच दिसत नव्हता अशी परिस्थिती होती. त्यामुळे काही प्रमाणात कोंडीही झाली. पोलीसांनी ती नियंत्रणात आणली. आकाश कंदील, लखलखणाऱ्या दिव्यांच्या माळा यांनी बाजरपेठा आणि रस्त्यांना दीपोत्सवाचा रंग चढला होता. 

पुण्यातही गर्दी…

’पुण्यात कोंडीतून वाट काढत अनेकांनी सहकुटुंब खरेदीचा आनंद लुटला. मध्यभागातील मंडई, शनिपार, हुतात्मा बाबू गेनू चौक परिसरात पूजा तसेच सजावट साहित्य खरेदीसाठी गर्दी होती.

’उपनगरातील कोथरूड, कर्वेनगर, वारजे, सहकारनगर, धनकवडी, कात्रज, येरवडा, हडपसर, विश्रांतवाडी, चंदननगर येथील बाजारपेठांमध्ये ग्राहकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

नागपूरमध्ये चैतन्य…

नागपूरमध्ये गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक सोने खरेदी झाली. त्याशिवाय वाहन खरेदी, बांधकाम क्षेत्रातही तेजी

आली आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजारातील उलाढाल करोनापूर्व काळाच्याच दिशेने जात आहे. 

ठाण्यात कोंडी…  येथील जांभळीनाका, राम मारुती रोड तसेच नौपाडा बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिक मोठ्याप्रमाणात घराबाहेर पडले. या गर्दीमुळे कोर्टनाका, जेल तलाव, सिडको, तलावपाली, राम मारुती रोड, गोखलेरोड भागात   वाहतूक कोंडी झाली. अवघे १० मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना अर्धा ते पाऊण तास लागत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Source: https://www.loksatta.com/mumbai/markets-across-the-state-including-mumbai-thane-are-abuzz-with-diwali-akp-94-2657439/