मुंबई बातम्या

सचिन वाझेची कोठडी मुंबई पोलिसांना मिळणार – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

गोरेगावमधील खंडणी प्रकरणाच्या तपासांतर्गत चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांना बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेची कोठडी मिळणार आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने केलेला अर्ज विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी मान्य करत वाझेची कोठडी १ नोव्हेंबरला गुन्हे शाखेकडे देण्याचे निर्देश तळोजा तुरुंग प्रशासनाला दिले.

‘खंडणी प्रकरणाच्या अधिक तपासासाठी वाझेची कोठडीत चौकशी करणे गरजेचे आहे’, असे सांगत गुन्हे शाखेने अर्ज दाखल केला होता. त्यामुळे न्यायालयाने तुरुंग प्रशासनाकडून वाझेच्या प्रकृतीविषयीचा अहवाल मागितला होता. त्याची प्रकृती ठीक असून तो प्रवास करू शकतो, असे स्पष्ट झाल्यानंतर न्यायाधीशांनी गुन्हे शाखेची विनंती मान्य केली.

दरम्यान, याच प्रकरणात मुख्य आरोपी असलेले माजी मुंबई पोलिस आयुक्त यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात यावे, अशी विनंती गुन्हे शाखेने न्यायदंडाधिकारी न्यायालयात केली असून त्याविषयी आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. बोहो रेस्टॉरंट आणि बीसीबी रेस्टॉरंट अँड बार हे चालवणारे व्यावसायिक बिमल अग्रवाल यांना व्यवसाय चालवण्याविषयी धमकावत त्यांच्याकडून खंडणी वसूल केली, असा आरोप परमबीर, वाझे व अन्य पोलिस अधिकाऱ्यांवर आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-police-will-get-the-custody-of-police-officer-sachin-waze-to-investigate-the-ransom-case-in-goregaon/articleshow/87383862.cms