मुंबई बातम्या

मुंबई राहणार ‘पॉवर’फुल – Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी,मुंबईः कोळशाच्या अनुपलब्धतेमुळे देशभरात वीज निर्मितीत अडथळा येण्याची भीती व्यक्त होत आहे. तसे असले, तरी मुंबईचा वीज पुरवठा मात्र सुरळीतच राहिल, अशी सकारात्मक चिन्हे आहेत. मुंबईला होणाऱ्या विजेच्या पुरवठ्यापैकी सर्वाधिक पुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटीच्या डहाणू प्रकल्पाने स्वदेशी तसेच आयात कोळशाच्या मिश्रणातून अखंड वीज निर्मिती सुरू ठेवली आहे, तर टाटा पॉवर कंपनीनेही वीजनिर्मिती वाढवली आहे. त्यामुळे कोळसाटंचाई असतानाही मुंबईला दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

करोना संकटातून उद्योग क्षेत्र झपाट्याने बाहेर पडत आहे. त्यामुळे उद्योगांची विजेची मागणी वाढलेली आहे. त्यातच सध्या सणासुदीचा काळ असल्याने बाजारातील एकूणच मागणी व रेलचेल वाढलेली आहे. परिणामी विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. एकीकडे, विजेची मागणी वाढली असतानाच, दुसरीकडे कोळशाची आवक मात्र घटली आहे. त्यामुळेच सध्या औष्णिक वीज प्रकल्पांसाठी वीज निर्मिती हे आव्हान ठरले आहे. तसे असले, तरी मुंबईचा वीज पुरवठा सध्या तरी सुरळीतच राहिल, असा संबंधितांना विश्वास आहे.

मागील महिन्यापर्यंत मुंबईची कमाल वीज मागणी दोन हजार मेगावॉट इतकी होती. पण आता ‘ऑक्टोबर हिट’ सुरू झाल्याने दुपारच्या वेळी विजेची मागणी वाढली आहे. दिवसभरातील कमाल वीज मागणी दोन हजार ३०० ते दोन हजार ४०० मेगावॉटदरम्यान गेली आहे. यामध्ये मुंबईला सर्वाधिक जवळपास एक हजार २०० मेगावॉट वीज पुरवठा अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (एईएमएल) या कंपनीकडून होतो. त्यापाठोपाठ टाटा पॉवर व बेस्टकडून पुरवली जाणारी वीज प्रत्येकी ६०० मेगावॉट आहे. बेस्ट कंपनी वेगवेगळ्या स्रोतांकडून वीज खरेदी करते, तर टाटा पॉवरला त्यांच्या स्वत:च्या ट्रॉम्बे व अन्य प्रकल्पांतून वीज मिळते.

यादरम्यान, ‘एईएमएल’ने आपला डहाणूचा प्रकल्प कमाल क्षमतेवर चालवत मुंबईचा वीज पुरवठा सुरळीत ठेवला आहे. संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एईएमएलच्या डहाणू प्रकल्पाची क्षमता ५०० मेगावॉट आहे. हा प्रकल्प सध्या सरासरी ४७० ते ४९५ मेगावॉट वीज उत्पादन करीत आहे. ही सर्व वीज ‘एईएमएल’कडूनच त्यांच्या मुंबईतील ग्राहकांना दिली जात आहे. या प्रकल्पापुढेही कोळसा टंचाईचे आव्हान आहे. पण स्वदेशी व आयात कोळसा यांच्या मिश्रणातून येथील वीज निर्मिती सुरळीत ठेवली जात आहे. उर्वरित वीज एक्सचेंजमधून खरेदी केले जात आहेत.’

हेल्पलाइन

आज, सोमवारच्या ‘भारत बंद’ दरम्यान वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची ग्वाही एईएमएलने दिली आहे. काही अडचण असल्यास १९१२२ हेल्पलाइन किंवा ९५९४५१९१२२ हा व्हॉट्सअॅप क्रमांक किंवा https://www.adanielectricity.com येथे संपर्क साधण्याचे आवाहन कंपनीने केले आहे.

टाटांकडूनही निर्मिती

मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या टाटा पॉवरनेदेखील आपल्या प्रकल्पातील वीज निर्मिती सर्वाधिक वाढवली आहे. टाटा पॉवरच्या ट्रॉम्बे येथील औष्णिक वीज प्रकल्पाची क्षमता ९३० मेगावॉट इतकी आहे. त्यातून सरासरी ६७० ते ७०० मेगावॉट इतकी वीज निर्मिती सध्या केली जात आहे. राज्यातील कोळशावर आधारित अन्य प्रकल्पांसमोर आव्हाने असताना, प्रामुख्याने आयात केलेल्या कोळशाद्वारे ही निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे. टाटाकडून जलविद्युत प्रकल्पातूनदेखील सरासरी ३० ते ५० मेगावॉट वीज निर्मिती होत आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/increase-power-generation-from-tata-power/articleshow/86926708.cms