मुंबई बातम्या

१५ दिवसांत मुंबई खड्डेमुक्त होणार; महापौरांची ग्वाही – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबईः मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून पालिकेत शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष विकोपाला गेला आहे. भाजपकडून लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत असतानाच, सेनाही त्यास प्रत्युत्तर देत आहे. यातच पुढील १५ दिवसांत मुंबई खड्डेमुक्त होणार असल्याची ग्वाही महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी दिली. विरोधकांनी याविषयी राजकारण न करता काही गोष्टी सामंजस्याने सोडविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

रस्त्यांवरील खड्डे आणि पालिकेत प्रत्यक्षऐवजी आभासी बैठका होत असल्याने भाजपने आंदोलन छेडले आहे. त्यावर बोलताना महापौरांनी खड्डे आणि पावसाळी आजारासंबधी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतल्याचे नमूद केले. शहरातील खड्डे पडलेल्या रस्त्यांची आपण स्वतः पाहणी केली असून, पालिका अधिकाऱ्यांना त्याचा जाब विचारला असल्याचे महापौरांनी सांगितले.

मुंबई पालिकेने खड्डे बुजविण्यासाठी एप्रिलपासून प्रारंभ केला असून, आतापर्यंत ४२ हजारांपेक्षा अधिक खड्डे बुजवण्यात आले आहेत. भाजप अकारण खड्ड्यांवरून राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

रस्त्यांवरील खड्डे योग्य तांत्रिक पद्धतीने भरले गेले पाहिजेत. त्यासाठी आवश्यक सामुग्रीचा पुरवठा झाला पाहिजे. त्या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही कुचराई होऊ नये. खड्डे बुजविताना वाहतूककोंडी होऊ नये यासाठी संध्याकाळनंतर कामे केली जातात. त्यावेळेस काहीजण त्यास अटकाव करत असून, मुंबईकरांचे हित लक्षात घेऊन त्यांनी हे थांबवावे, असे आवाहन महापौरांनी केले.

पुढील महिन्यापासून पालिका सभागृहासह इतर समित्यांचे कामकाज प्रत्यक्ष सदस्यांच्या उपस्थितीत सुरू करण्याविषयी पालिका आयुक्तांना पत्र दिल्याचे महापौरांनी सांगितले. कुर्ला येथील एल विभागातील रस्त्यांच्या पाहणीमध्ये कोणताही स्टंट नसून संबंधित अधिकारी जुनी छायाचित्रे दाखवत होते. ती छायाचित्रे आणि सद्यस्थितीमध्ये असलेला फरक आपण त्यांना दाखवून दिला, असे त्या म्हणाल्या.

रस्तेअभियंत्यांवर जबाबदारी द्यावी

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी पालिकेच्या रस्तेअभियंत्यांवर जबाबदारी सोपविली पाहिजे. त्या-त्या विभागातील खड्डे बुजविण्यात आले की नाहीत याची पाहणी प्रशासनाने करणे आवश्यक आहे. तसेच खड्डे भरण्यासाठी कोणत्याही स्वरूपात कामचुकारपणा होत असल्यास त्यांच्यावर कडक कारवाई गरजेची असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/ext-15-days-important-for-pothole-free-mumbai-says-kishori-pednekar/articleshow/86635019.cms