मुंबई बातम्या

विजयासह मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत केला मोठा बदल, पाहा कितवे स्थान पटकावले… – Maharashtra Times

आबुधाबी : मुंबई इंडियन्सला आजच्या चौथ्या सामन्यात पहिला विजय मिळवला. त्यामुळे या विजयासह मुंबई इंडियन्सा दोन गुण मिळाले आहेत, या दोन गुणांमुळे आता गुणतालिकेत मोठा बदल झालेला आहे.
या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघाने १० सामने खेळले होते आणि त्यांना चार विजय मिळवता आले आहे. त्यामुळे आठ गुणांसह ते गुणतालिकेत सातव्या स्थानावर होते. पण या विजयासह मुंबईने गुणतालिकेत मोठा बदल केला आहे. कारण या विजयानंतर मुंबईने गुणतालिकेत १० गुणांसह पाचवे स्थान पटकावले आहे. या पराभवानंतर पंजाब किंग्सच्या संघाने आठच गुण राहिले आहेत. त्यामुळे ११ सामन्यांनंतरही ते सहाव्या स्थानावर आहेत. या विजयानंतर आता मुंबई इंडियन्सचे प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता वाढलेली आहे. कारण आता मुंबईचा संघ चांगल्या लयीत आला आहे. त्यामुळे मुंबईने यापुढचे तिन्ही सामने जिकले तर ते सहजपणे प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकतात. आता संघातील कायरन पोलार्ड आणि हार्दिक पंड्या हे चांगल्या फॉर्मात आल्याचे दिसत आहेत. त्यामुळे यापुढेही त्यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा असेल.

पंजाबच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातीलाच रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यारुपात दोन मोठे धक्के बसले होते. त्यानंतर क्विंटन डीकॉकने काही काळ चांगली फलंदाजी केली, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पण त्यानंतर सौरभ तिवारीने दमदार फलंदाजी करत संघाचा धावफलक हलता ठेवण्याची जबाबदारी चोख बजावली होती. पण अर्धशतकाला पाच धावा हव्या असताना तिवारी बाद झाला, तिवारीने यावेळी ३७ चेंडूंत तीन षटकार आणि दोन चौकारांच्या जोरावर ४५ धावांची खेळी साकारली. तिवारीनंतर हार्दिक पंड्या आणि कायरन पोलार्ड यांनी धडाकेबाज फलंदाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे गुणतालिकेत मुंबईने पाचवे स्थान पटकावले आहे, आता मुंबईचा संघ उर्वरीत तीन सामन्यांमध्ये कशी कामगिरी करतो, याची उत्सुकता सर्वांना असेल. कारण प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना पहिल्या चार संघांमध्ये स्थान पटकावे लागणार आहे.

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/mumbai-indians-get-5th-position-in-points-table-after-beating-punjab-kings-by-6-wickets/articleshow/86590607.cms