मुंबई बातम्या

मुंबई मेट्रोचा ‘रंग दे’ उत्सव – Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील संस्कृती आणि नवोदित चित्रकारांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मुंबई मेट्रो वनने पुढाकार घेतला आहे. माझी मेट्रो २०२१ या उत्सवातील ‘रंग दे मेट्रो’ या उपक्रमांतर्गत तरुणांना आपल्या स्वप्नातल्या मेट्रो स्थानकांतील रंग प्रत्यक्षातील मेट्रो स्थानकांना देता येणार आहे. आज, मंगळवारपासून या उत्सवासाठी नावनोंदणी सुरू होणार आहे.

१७ ऑगस्ट ते १७ डिसेंबर यादरम्यान टप्प्याटप्प्याने हा उत्सव सुरू राहणार आहे. उपक्रमांत सहभागी झालेल्या तरुणांची त्यांनी काढलेल्या चित्रांच्या आधारे निवड करण्यात येईल. निवड झालेल्यांसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. त्यांनंतर स्वसंकल्पनेवर आधारित चित्र काढण्याची संधी दिली जाईल. या उपक्रमात परीक्षकांच्या पथकांकडून अंतिम पाहणी होईल. यातील सर्वोत्तम चित्र कलाकृती मेट्रो स्थानकावरील खांबावर रेखाटली जाईल. या उपक्रमांत सहभागी होण्यासाठी रिलायंस मुंबई मेट्रोच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन मेट्रो वनच्या प्रवक्त्यांकडून करण्यात आले आहे.

ललित कला अकादमीचे कार्यकारी मंडळ सदस्य किशोर कुमार दास आणि सर जे.जे. कला महाविद्यालयातील मारुती शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न होणार आहे. करोना निर्बंध शिथील झाल्याने पुन्हा जनजीवन सुरळीत होत आहे. रेल्वेसह मेट्रो प्रवासही सुरू झाला आहे. करोनाकाळातील नकारात्मकता झटकून नव्या दमाने भविष्यातील आयुष्यात रंग भरता यावे, यासाठी सांस्कृतिक मंत्रालय आणि गृहनिर्माण मंत्रालयाच्या मदतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/reliance-infrastructures-initiative-to-provide-a-platform-for-culture-and-emerging-painters-in-mumbai/articleshow/85390440.cms