मुंबई बातम्या

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीजवळ आढळली पेट्रोलने भरलेली बाटली; मोठा अपघात टळला – Loksatta

बुधवारी सायंकाळी वाकोल्यातील गावदेवी झोपडपट्टीपासून मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर पेट्रोलसह लहान प्लास्टिकची बाटली फेकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कचरा आणि इतर साहित्य बऱ्याचदा झोपडपट्टीतून विमानतळ परिसरात टाकण्यात येते. पण स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतल्याचे विमानतळ आणि पोलीसांनी सांगितले आहे.

ही घटना घडताच मुंबई विमानतळावरील सुरक्षा कर्मचारी धावपट्टीच्या दिशेने धावले. अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, ही घटना बुधवारी रात्री ९ च्या सुमारास घडली. विमानतळाच्या सुरक्षेत तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) सुरक्षा अधिकाऱ्याला गांवदेवी झोपडपट्टीजवळ विमानतळाच्या सीमा भिंतीबाहेर पडलेली वस्तू दिसली.

यानंतर बॉम्बशोधक पथकाने पेट्रोलने भरलेली बाटली जप्त केली. ते म्हणाले की, या घटनेमुळे विमान उड्डाणांवर परिणाम झाला नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना कळवले, ज्यांनी झोपडपट्टीत शोध घेतला, पण हे कृत्य करणाऱ्याची ओळख पटवता आली नाही.

“विमानतळाच्या सीमेवरील भिंतीला लागून असणाऱ्या झोपडपट्टीतील काही जणांनी भिंतीवर कचरा फेकला. कचऱ्यामध्ये सुमारे ५० मिली पेट्रोल असलेली प्लास्टिकची बाटली होती,’’ अशी माहिती पोलीस उपायुक्त (झोन आठवा) मंजुनाथ सिंगे यांनी दिली. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी विमानतळाच्या परिसरात असणाऱ्या भिंतीवर तैनात केलेल्या नियंत्रण कक्षाला सतर्क केले. त्यानंतर बॉम्ब निकामी आणि शोध पथक आणि श्वान पथक घटनास्थळी पाठवण्यात आले.

मुंबई विमानतळाच्या जवळ गावदेवी झोपडपट्टी आहे. सुरक्षेसाठी एक सीमा भिंत आहे पण काही जणांकडून त्यावरुन कचरा टाकला जातो. विमानतळाची सुरक्षा सीआयएसएफकडे सोपवण्यात आली आहे. राजधानी दिल्ली नंतर हे देशातील दुसरे व्यस्त विमानतळ आहे. विमानतळाच्या सुरक्षेबरोबरच सीआयएसएफ तेथे येणाऱ्या प्रवाशांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधांवरही नियंत्रण ठेवते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on August 13, 2021 2:11 pm

Web Title: plastic bottle petrol mumbai airport from nearby slums abn 97

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/plastic-bottle-petrol-mumbai-airport-from-nearby-slums-abn-97-2562328/