मुंबई बातम्या

मुंबईत शिष्यवृत्ती परीक्षा रद्दच – Loksatta

पालिकेच्या हटवादामुळे २५ हजार विद्यार्थी वंचित

मुंबई : पाचवी आणि आठवीचे राज्यभरातील विद्यार्थी गुरुवारी शिष्यवृत्ती परीक्षा देणार असून, मुंबईतील विद्यार्थ्यांना मात्र या परीक्षेपासून वंचित राहावे लागणार आहे. मुंबईत गुरुवारी परीक्षा होऊ न देण्याची भूमिका महापालिकेने घेतल्यामुळे मुंबईपुरती ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय बुधवारी सायंकाळी घेण्यात आला.

राज्यातील पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येते. सुरुवातीला ८ मे रोजी नियोजित असलेली शिष्यवृत्ती परीक्षा तीन वेळा लांबणीवर टाकून अखेर १२ ऑगस्ट रोजी घेण्याचे परीक्षा परिषदेने निश्चित केले. मात्र, मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात गुरुवारी परीक्षा घेऊ नयेत, असे आदेश महापालिकेच्या आयुक्तांनी दिले. परीक्षा पुढे ढकलण्यात यावी किंवा ऑनलाइन आयोजित करण्यात यावी, अशी मागणी परीक्षा परिषदेकडे करण्यात आली. मात्र, परीक्षा परिषदेने या दोन्ही पर्यायांचा विचार केला नाही. त्यामुळे मुंबईत महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये गुरुवारी होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय बुधवारी रात्री जाहीर करण्यात आला. त्यामुळे महापालिका आणि खासगी शाळांमधील जवळपास २५ हजार विद्यार्थ्यांची तयारी करूनही त्यांना  परीक्षा देता येणार नाही.

उलट-सुलट निर्णयांनी गोंधळ

मुंबईत शिष्यवृत्ती परीक्षा होणार की नाही? पालिका शाळांपुरतीच परीक्षा रद्द होणार की खासगी शाळांमध्येही परीक्षा होणार नाही, अशा संभ्र्रम बुधवारी दिवसभर पालक आणि शिक्षकांमध्ये होता. मुंबईत शिष्यवृत्ती परीक्षा होणार नसल्याचे पत्र मंगळवारी शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले. हा निर्णय फक्त महापालिका शाळांपुरताच असून खासगी शाळांतील विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार शाळांनी पालक आणि विद्यार्थ्यांना परीक्षा होणार असल्याचे संदेश पाठवले. दुपारी परीक्षा फक्त पालिका शाळेतील विद्यार्थ्यांपुरतीच रद्द केली असल्याची पत्रकेही अधिकाऱ्यांनी काढली. त्यानंतर सायंकाळी मुंबईतील कोणत्याही शाळेत ही परीक्षा होणार नाही, असे पत्र काढण्यात आले. अखेर मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने मुंबई महापालिका क्षेत्रात परीक्षा होणार नसल्याचे स्पष्ट करणारे परिपत्रक बुधवारी रात्री प्रसिद्ध केले.

परीक्षा देणे हा आमचा अधिकार नाही का?

शिष्यवृत्ती परीक्षा ऐच्छिक असते. ही गेल्या वर्षीची परीक्षा आहे. त्यानुसार आता ही परीक्षा देणारे विद्यार्थी पुढील इयत्तेत गेले आहेत. तरीही या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी केली. शाळांनीही नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावरही या परीक्षेच्या अतिरिक्त ऑनलाइन तासिका घेतल्या. विद्यार्थी आणि पालकांची तयारी झालेली असताना परीक्षा रद्द का केली असा प्रशद्ब्रा पालकांनी उपस्थित केला आहे. परीक्षा रद्द करायची होती तर आदल्या दिवशीपर्यंत त्याबाबत निर्णय का घेण्यात आला नाही, असाही प्रशद्ब्रा पालकांनी उपस्थित केला आहे.

परीक्षेबाबत संदिग्धता

राज्यात मुंबई वगळता सर्व ठिकाणी नियोजित वेळापत्रकानुसार आणि केंद्रावर परीक्षा होणार आहे, असे परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी स्पष्ट केले. मुंबईतील परीक्षांबाबत परिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. ही परीक्षा ऑगस्टअखेरीस ऑनलाइन घेण्यात यावी अशी मागणी महापालिकेने केली आहे.

मुंबईत विद्यार्थी किती?

खासगी शाळा : पाचवी : ८८३०, आठवी : ७५३५

पालिका शाळा : पाचवी : ४४५२, आठवी : ४१३२

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on August 12, 2021 1:06 am

Web Title: scholarship examination canceled in mumbai akp 94

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/scholarship-examination-canceled-in-mumbai-akp-94-2560675/