मुंबई बातम्या

घरोघरी लसीकरण : मुंबई महापालिकेची हायकोर्टात महत्त्वाची माहिती – Sakal

मुंबई : घरोघरी लसीकरण मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत 4889 पैकी 1317 बेडरिडन नागरिकांना लस देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यात आली. यामुळे 30 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान नोंदणी झालेल्या एक तृतीयांश नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

हेही वाचा: अनाथांना नोकरी, शिक्षणामध्ये 1 टक्के आरक्षण

महापालिकेने या मोहिमेत सामाजिक संस्थेची मदत घेतली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या ईमेलवर नोंदणी करण्यात आलेल्या 602 नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर सध्या येत्या आठवड्यात 715 नागरिकांना लस देण्यात येणार आहे. लस देण्याआधी संबंधित नागरिकांबाबत सर्वेक्षण केले जाते. तसेच लस दिल्यानंतर त्यांच्या प्रक्रुतीची माहिती घेण्यात येते आणि अद्याप कोणताही दुष्परिणाम आढळला नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

आरोग्य विभागावरील ताण कमी करण्यासाठी स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली जात आहे, रुग्णालयातून रुग्णवाहिका घेणे, नोंदणी केलेल्या रहिवाशांना दोन तीन दिवस आधी फोन करून माहिती देणे आणि प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सहाय्य करणे आदी मदत संस्थेच्या वतीने केली जाते, असेही महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

हेही वाचा: पहिल्याच दिवशी 17 हजारांहून अधिक लसधारकांना मिळाला लोकलचा मासिक पास

पंचाहत्तर वर्षांवरील नागरिक आणि बेडरिडन नागरिकांना घरी जाऊन लसीकरण देण्यासाठी एड ध्रुती कपाडिया आणि एड कुणाल तिवारी यांनी याचिका केली आहे. मुख्य न्या दिपांकर दत्ता आणि न्या गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. सामाजिक संस्थेचे काम आणि आतापर्यंतच्या या मोहिमेचा अहवाल दाखल करण्याचे निर्दोष न्यायालयाने दिले होते. महापालिकेने एक हेल्पलाईन सुरू करावी, अशी मागणी याचिकादारांनी बुधवारी केली. गुरुवारी यावर पुढील सुनावणी होणार आहे.

Source: https://www.esakal.com/mumbai/home-vaccination-important-information-of-mumbai-municipal-corporation-in-the-high-court-atk97