मुंबई बातम्या

मुंबई-गोवा वाहतुकीला ‘ब्रेक’, सावित्री पुलाजवळ महामार्गाचा भाग गेला वाहून – Sakal

अलिबाग – मुसळधार पावसाने महाड तालुक्यातील सावित्री पुलाच्या अलीकडे मुंबई-गोवा महामार्गालगतचा मातीचा भराव वाहून गेल्याने भलेमोठे भगदाड पडले आहे. केवळ एक चारचाकी वाहन जाईल इतकाच महामार्गाचा भाग उरला आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे; मात्र पाऊस आणि रहदारीमुळे कामामध्ये अनेक अडचणी येत आहेत.

सावित्री नदीला आलेल्या महापुरात महामार्गाचा हा भाग वाहून गेला. भरावाची माती वाहून गेल्याने डांबरीकरणालाही तडे गेले. वरून चकाचक दिसणाऱ्या महामार्गाचा साधारण ५० फुटांचा भाग वाहून गेला आहे. केवळ १० फुटांचा अरुंद भाग शिल्लक आहे. या भागावरून एका वेळी एकच वाहन जाऊ शकते. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. अवजड वाहन गेल्यास शिल्लक राहिलेला भागदेखील कोसळून जाण्याची शक्यता या मार्गावरून जाताना वाहनचालकांना जाणवत आहे; मात्र महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी याचे सर्व खापर पावसावर फोडत आहेत.

हेही वाचा: राज्यातील पूरबळींची संख्या १४९ वर; किमान १०० जण बेपत्ता

करोडो रुपये खर्च करून आणि जो मार्ग कोणत्याही परिस्थितीत शाबूत राहील याची ग्वाही अधिकारी देत असताना पुरात वाहून गेला आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग न ठेवल्याने डोंगरावरून येणाऱ्या पाण्याला जागाच राहिली नाही. त्याच वेळेला सावित्री नदीच्या प्रवाहाने कमकुवत झालेली भरावाची माती वाहून गेली. या मार्गासाठी पर्यायी मार्ग नसल्याने लवकरात लवकर त्याची दुरुस्ती करावी लागणार आहे; अन्यथा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता वाहनचालक व्यक्त करीत आहेत.

महामार्गाचा वाहून गेलेला भाग पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा कामास लावलेली आहे. हा मार्ग लवकरात लवकर करण्याचे प्रयत्न आहेत. तरीही पडणारा पाऊस आणि भरावासाठी माती नसल्याने समस्या जाणवत आहेत. पुढील तीन ते चार दिवसांत हा मार्ग व्यवस्थित होईल. – श्रीकांत बांगर, कार्यकारी अभियंता- राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, पेण

हेही वाचा: रायगड, कोल्हापूरमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीला BMC, दोन पथके रवाना

पुरामध्ये सावित्री नदीपुलाच्या अलीकडील भाग पूर्णपणे पाण्याखाली गेलेला होता. पाण्याचा जोर जबरदस्त होता. यामुळे मातीचा भराव वाहून गेला. रस्त्याखालील माती वाहून गेल्याने वरील डांबरीकरणाचा भागदेखील कोसळला. दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी होते. पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग न मिळाल्याने हा रस्ता खचला असावा. – अस्लम मुकादम, चालक-महाड

Source: https://www.esakal.com/maharashtra/mumbai-goa-highway-road-damage-in-flood-near-savitri-bridge-ssy93