मुंबई बातम्या

मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस – Loksatta

मुंबई : मुंबई आणि परिसरात बुधवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. महालक्ष्मी येथे रात्री ८ वाजेपर्यंत २४ तासांत १२५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मंगळवारी सकाळी ८.३० ते बुधवारी सकाळी ८.३० या कालावधीत कु लाबा येथे १११.२ मिलीमीटर आणि सांताक्रूझ येथे ८९.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेले २ दिवस हवामान विभागाने तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानंतर मिरा रोड, भाईंदर, महालक्ष्मी, राम मंदिर अशी काही ठिकाणे वगळता अन्य ठिकाणी मात्र पावसाने अपेक्षित प्रमाणात हजेरी लावली नाही.

गेल्या ४ दिवसांपासून मुंबईत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो आहे. पालिके च्या नोंदीनुसार बुधवारी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुंबई शहर भागात २२.५६ मिलीमीटर, पूर्व उपनगरात १२.५९ मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात १९.३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रायगडमध्ये ५२.२ मिलीमीटर, रत्नागिरी येथे ३३ मिलीमीटर पाऊस पडला. संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागात ढगांची दाटी झाली होती. त्यामुळे दिवसभर हवामान ढगाळ होते. मुंबई, ठाणे, पालघर येथे आणखी २ दिवस पाऊस मुसळधार असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी येथे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रायगडमध्येही मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पावसाळी वातावरणामुळे मुंबईच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत २ अंशांपर्यंत घट झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on July 15, 2021 1:32 am

Web Title: heavy rains lashed mumbai and surrounding areas zws 70

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/heavy-rains-lashed-mumbai-and-surrounding-areas-zws-70-2529586/