मुंबई बातम्या

मुंबई महापालिकेतील महिला अधिकाऱ्याचेच ‘नोकरी रॅकेट’ – Maharashtra Times

म. टा. खास प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसविणाऱ्या टोळीला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली असून, यामध्ये पालिकेच्या शिक्षण विभागातील महिला अधिकारी प्रांजली भोसले यांचा समावेश आहे. भोसले या आपल्या पती आणि एका निवृत्त पालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने ही टोळी चालवत होती. मुंबईसह राज्यभरातील शेकडो तरुणांना त्यांनी फसविल्याचे समोर आले आहे.

मुंबई महापालिकेत नोकरी लावण्याचे आश्वासन देऊन बेरोजगार तरुणांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असल्याचे प्रकार वारंवार घडत होते. सर्वसामान्य कुटुंबातील गरीब तरुणांची लुबाडणूक केली जात असल्याने याची गंभीर दखल घेत मालमत्ता कक्षाचे प्रभारी पोलिस निरीक्षक शशिकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, सहायक निरीक्षक सचिन कदम, नागेश पुराणिक, उपनिरीक्षक मनोज पाटील, गादेकर, साळुंखे यांचे पथक तपासाला लागले. फसवणूक झालेल्या तरुणांकडून माहिती घेत असताना यामध्ये पालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकारी प्रांजली भोसले यांचाही यामध्ये हात असल्याचे दिसून आले. ऑक्टोबर, २०२०पासून प्रांजली या कामावर आल्या नसल्याचे समजले. त्यांच्या निवासस्थानाचा शोध घेत असताना प्रांजली या पती लक्ष्मण भोसले यांच्यासोबत गायब असल्याचे कळले. पोलिसांच्या पथकाने या दाम्पत्याचा माग सोडला नाही. तांत्रिक माहितीच्या आधारे गोवा येथील कंडोलिम येथून पोलिसांनी त्यांना शोधून काढले.

प्रांजली आणि लक्ष्मण यांच्या चौकशीतून त्यांच्या इतर साथीदारांची नावे पुढे आली. यावरून पोलिसांनी ठाणे आणि कल्याण येथून राजेश भोसले, महेंद्र भोसले आणि सोमलिंगप्पा डिलकर या तिघांना अटक केली. डिलकर हा पालिकेचा निवृत्त अधिकारी आहे. यामध्ये आणखी काही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दोन कोटींपेक्षा अधिक कमाई

पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये या टोळीने बेरोजगारांची फसवणूक करून २ कोटी २७ लाख इतकी रक्कम जमवली आहे. हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. अशाचप्रकारे या टोळीने कुणाची फसवणूक केली असल्यास मालमत्ता कक्ष, तिसरा मजला, गेस्ट हाऊस इमारत, वाहतूक प्रशिक्षण संस्था आवार, भायखळा पोलिस ठाण्याजवळ, भायखळा (पूर्व) या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे

Source: https://maharashtratimes.com/crime-news/mumbai-crime-news-bmc-official-three-others-cheat-multiple-people-of-lakhs-on-pretext-of-providing-jobs/articleshow/84061931.cms