मुंबई बातम्या

“मुंबई महापालिकेला शरमेनं मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे” – Loksatta

घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या डोळ्याला उंदराने चावा घेऊन जखमी केल्याची घटना काल (मंगळवार) समोर आली. रुग्णालय प्रशासनाने ही घटना घडल्याचे मान्य केले असून याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. दरम्यान, आता यावरून भाजपा नेते व विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी मुंबई महापालिकेवर जोरदार टीका केली आहे.

मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात, उंदराने एका रुग्णाचे डोळे कुरतडले असल्याचा प्रकार धक्कादायक आहे, आज त्या रुग्णालयात जाऊन रुग्णाची विचारपूस केली. मुंबई महापालिकेला शरमेनं मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे. अशी दरेकरांनी टीका केली आहे.



मुंबई : ICU मध्ये रुग्णाच्या डोळ्याजवळ उंदराचा चावा, राजावाडी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार!

तसेच, मुख्यमंत्री घराबाहेर पडेनात, महापौरांकडे लक्ष द्यायला वेळ मिळेना! इथे सगळेच ‘राम भरोसे’ राजावाडी रुग्णालयात उंदराने डोळा कुरतडलेल्या रुग्णाची भेट घेऊन विचारपूस केली. महापालिकेच्या माध्यमातून मुंबईला कुरतडणाऱ्या अशा ‘उंदरांचा’ लवकरच बंदोबस्त करावा लागणार आहे. असं देखील दरेकरांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

तसेच रूग्णालाबाहेर माध्यमांशी बोलाताना दरेकर म्हणाले, “डॉक्टरांनी आपल्यापरीने महापालिकेची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु या ठिकाणी १०० टक्के शरमने मान खाली मुंबईकरांना घालावी लागेल, किंबहुना महापालिकेला अशा प्रकारची भयानक गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे. असाच प्रकार सायन हॉस्पिटलमध्ये यापूर्वी देखील घडला होता. जर महापालिका करोना काळात सर्वोत्तम म्हणून स्वतःची पाठ थोपटवून घेत आहे आणि अशावेळी उंदीर जर एखाद्या आयसीयूमधील रूग्णाचे डोळे कुरतडत असेल, तर या पेक्षा गंभीर दुसरी बाब असू शकत नाही. मनपाच्या नियमांनुसार तिथं सॅनिटायझेशनची आवश्यकता असते, जर व्यवस्थित सॅनिटायझेशन झालेलं असतं, तर तिथं उंदीर येऊ शकला नसता. याचा अर्थ सॅनिटायझेशन करणारी यंत्रणा कमी पडली का? मग ते संबंधित अधिकारी कुठं आहेत? या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. केवळ चौकशी झाली अहवाल आला आणि तो बासनात गुंडाळून ठेवला, असा प्रकार होता कामानये. लोकं आता घाबरले आहेत, सायन हॉस्पिटलला या अगोदर असा प्रकार झालेला असुनही तुम्ही सुधरला नाहीत. आता राजावाडी रूग्णालयात घडला आहे. इथले डॉक्टर्स देखील बाहेरचे आहेत, त्यामुळे मी या प्रकाराबद्दल अधिवेशनात सरकारला जाब विचारणार आहे.”

रुग्णाच्या डोळ्याला उंदीर चावल्याने इजा

दरम्यान, या घटनेनंतर पालिका रुग्णालयातील स्वच्छतेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तर, महापौरांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी उपाययोजना केल्या जातील, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. रुग्णालयात घडलेला हा प्रकार गंभीर असून नेत्ररोग विभागाच्या डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी केली आहे. डोळ्याला इजा झालेली नाही रुग्णाच्या पापण्याखाली जखमा झालेल्या आहे. याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on June 23, 2021 3:41 pm

Web Title: this is an incident that makes mumbai municipal corporation feel ashamed pravin darekar msr 87

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/this-is-an-incident-that-makes-mumbai-municipal-corporation-feel-ashamed-pravin-darekar-msr-87-2508701/