मुंबई बातम्या

कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना बॉम्बे डाईंगमध्ये घर : जितेंद्र आव्हाड – Dainik Prabhat

मुंबई  – मुंबई शहरात कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवासाची सोय करण्यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयाला 100 सदनिका हस्तांतरित करण्याच्या म्हाडाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्यानंतर झालेल्या वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तोडगा काढला आहे.

कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांना बॉम्बे डाईंगमध्ये घर मिळणार असल्याचे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले.

टाटा रुग्णालयाला आणि तिथे येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 100 सदनिका हाजी कासम चाळीत देण्यात आल्या होत्या. पण तेथील स्थानिकांनी आक्षेप घेतल्याने आणि त्यांनी तो आक्षेप स्थानिक आमदारांकडे नोंदवल्याने आमदारांनी तो प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारी नेला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

पण ती स्थगिती देतानाच कॅबिनेटच्या आधी मुख्यमंत्र्यांनी मला बोलावून घेतले आणि त्याच परिसरात जागा शोध आणि ताबडतोब त्याबाबत कारवाई करा, असे सांगितले. यानंतर आम्ही शोध घेतला असता 100 जागा बॉम्बे डाईंगमध्ये असणाऱ्या 22 इमारतींमध्ये आहे. त्यामुळे आम्हाला आता 100 जागा टाटा हॉस्पिटलला बॉम्बे डाईंगमध्ये देता येतील, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोणताही दुरावा नाही
मुख्यमंत्री आणि आमच्यात कोणताही दुरावा झालेला नाही. स्थानिक लोक, आमदारांनी घेतलेल्या आक्षेपामुळेच हा निर्णय घेण्यात आला होता. तसेच विसंवाद असता तर 24 तासांच्या आत निर्णय झाला नसता. मला आनंद आहे की, काल मिळालेल्या स्थगितीवर लगेच निर्णय झाला असून परत तेवढ्याच जागा, तेवढ्याच जवळ, चांगल्या परिसरात कॅन्सर रुग्णांना देऊ शकलो, असे आव्हाड म्हणाले. तसेच हाजी कासम चाळीमधील जागा राखीव ठेवून बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी कदाचित वापर करु, अशी माहिती त्यांनी दिली.

Source: https://www.dainikprabhat.com/home-to-relatives-of-cancer-patients-in-bombay-dyeing-jitendra-awhad/