मुंबई बातम्या

मुंबईत सोने विक्रीत येणार अडचणी ?; ‘हे’ आहे कारण – Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी

मुंबई : देशात विक्री होणारा प्रत्येक दागिना हा ‘हॉलमार्किंग’ केलेला असावा, असा नियम केंद्र सरकारने १६ जूनपासून लागू केला आहे. पण मुंबईसारख्या सोने व्यापाराचा हब असलेल्या ठिकाणी फक्त २५ टक्के व्यापाऱ्यांची नोंदणी झाली आहे. यामुळे सोने खरेदीदार व विक्रेता, या दोघांसाठीही हे डोकेदुखीचे ठरणार आहे. मुंबई शहर व उपनगरात जवळपास २० हजार सराफा व्यावसायिक आहेत. पण त्यापैकी फक्त साडे चार ते ५ हजार व्यावसायिकांची आत्तापर्यंत हॉलमार्किंगसाठी नोंदणी झाली आहे. त्यामुळेच सोने विक्रीत अडचणी येण्याची शक्यता आहे.

मुंबई ज्वेलरी असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमारपाल जैन यांनी सांगितले, ‘सोने दागिना क्षेत्रात साचेबद्धता आणण्यासाठी हॉलमार्किंग महत्त्वाचे आहेच. पण सध्या करोना संकट असल्याने या निर्णयाला मुदतवाढीची गरज होती. आधीच बाजारात उलाढाल कमी आहे. त्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात अडथळे येत आहेत. पण व्यावसायिक पूर्ण क्षमतेने स्वत:ची नोंद करून घेण्याच्या प्रयत्नात आहे.’ दुसरीकडे, हॉलमार्किंग करून देणाऱ्या प्रयोगशाळांचा आकडादेखील तुलनेने कमी आहे. दागिन्यांना हॉलमार्किंग करून देणाऱ्या मुंबई शहर व उपनगरात सध्या ५३ प्रयोगशाळा आहेत. या आकडा देशभरातील ९५९ प्रयोगशाळांच्या तुलनेत जेमतेम साडे पाच टक्के आहे. त्याचवेळी मुंबईतील सोन्याची मागणी किंवा सोने उलाढाल देशाच्या एकूण मागणीच्या ६० टक्के आहे. मुंबई ही सोन्याला पैलू पाडून दागिने तयार करण्याचा हब आहे. देशाच्या बहुतांश भागांना दागिने येथूनच पुरवले जातात. यामुळेच आता १६ जूनपासून हॉलमार्किंग अनिवार्य झाले असताना ते करून देणाऱ्या प्रयोगशाळांची संख्या वाढविणे अत्यावश्यक असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

असे होते हॉलमार्किंग…

हॉलमार्किंग हे सोन्याची शुद्धता व त्याचे वजन यांचे प्रमाणपत्र देणारी यंत्रणा आहे. हे प्रमाणपत्र सांकेतिक भाषेत दागिन्यावरच कोरले जाते. त्यावर केंद्र सरकारच्या केंद्रीय मानके ब्युरोचा (बीआयएस) लोगो, दागिन्याची शुद्धता, हॉलमार्किंग केंद्राचा लोगो व दागिना उत्पादकाचा लोगो यांचा समावेश असतो. यामुळे हा दागिना देशभरात कुठेही विक्री करता येईल.

घडणावळ महागणार

प्रत्येक दागिन्यासाठी हॉलमार्किंग अनिवार्य असल्याने आता घडणावळ महागणार आहे. प्रत्येक सोनार हॉलमार्किंग करण्याचे शुल्क ग्राहकाकडून वसूल करेल. परिणामी आता घडणावळ प्रति ग्रॅम ५०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/in-mumbai-only-25-per-cent-golden-trader-register-for-hallmarking/articleshow/83663439.cms