मुंबई बातम्या

पहिल्या पावसात मुंबई तुंबली; पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यावर शंका – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • पहिल्याच पावसात मुंबईकरांची दाणादाण
  • महापालिकेचा दावा; नालेसफाई पूर्ण
  • विरोधकांनी साधला पालिकेवर निशाणा

मुंबईः मुंबईत मान्सून दाखल झाल्यानंतर पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली आहे. मुंबई महापालिकेनं अलीकडेच १०४ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला होता. मात्र, पहिल्याच पावसात पालिकेचा हा दावा फोल ठरल्याची टीका विरोधकांनी केला आहे.

मुंबई पालिकेने शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरात १०० टक्क्यांहून अधिक नालेसफाई केल्याचा दावा केला आहे. पावसाळा सुरू होत असतानाच, मुंबईकरांची समस्या दूर करण्यासाठी पालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही नालेसफाई केल्याचे म्हटले होते. तसंच, पालिकेने मिठी नदीतील ८० टक्के आणि मोठ्या नाल्यांतून ३० टक्क्यांपर्यंत जादा गाळ काढल्याचे म्हटले आहे. मात्र पालिकेच्या या दाव्यावर विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे.

वाचाः Live: रेल्वे स्थानकांवर पाणी साचले; मध्य, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

‘पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. १०४ टक्के गाळ काढल्याचा दावा केला गेला पण नाल्यातील गाळाऐवजी सर्वसामान्यांनी महापालिकेला भरलेल्या करातून माल काढला गेला. १०० कोटींचं टार्गेट असणारा एक सचिन वाझे सापडला पण असे सचिन वाझे ठिकठिकाणी असल्यावर सर्वसामान्य मुंबईकरांच्या नशिबी तुंबलेली मुंबई,’ अशी टीका भाजप नेते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

मुंबईची तुंबई

मुंबईत आज मान्सून दाखल झाला आहे. पहिल्याच पावसानं मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली आहे. सकाळीच कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची धावपळ उडाली आहे. मुंबई व उपनगरासाठी २४ तास मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुंबईत आणि उपनगरात आज सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. दादर, कुर्ला, सायन, मुलुंड, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, गोवंडी या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईतील दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला आहे.

वाचाः पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई; लोकल ठप्प, वाहतूक कोंडीमुळं मुंबईकरांचे हाल

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/waterlogging-in-mumbaibjp-criticized-bmc/articleshow/83364437.cms