मुंबई बातम्या

राजधानी मुंबईत लॉकडाऊन शिथिल; ६ नवे नियम केले लागू – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • मुंबई शहरातही अनलॉक प्रक्रियेला सुरुवात
  • दुकानांच्या वेळा बदलल्या
  • महापालिका आयुक्तांनी जारी केले नवे नियम

मुंबई : राज्यातील करोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्यानंतर विविध जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल केले जात आहेत. पुणे शहरात अनलॉक प्रक्रियेनंतर काही निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर आता राजधानी मुंबईतही लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये बदल करत नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.

मुंबईत करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सुरुवात काळात रुग्णसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आढळत होती. मात्र प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे आता नागरिकांना लॉकडाऊनमधून दिलासा देण्यात आला आहे. दुकानांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. तसंच ई कॉमर्स अंतर्गत वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावरील बंधनांमध्येही शिथिलता आणण्यात आली आहे.

मुंबईत काय आहेत नवे नियम?

१. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहतील.

२. अत्यावश्यक नसलेल्या गोष्टींची दुकाने सोमवार ते शुक्रवार हे काही बंधनांसह सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू ठेवता येतील.

कोणती बंधने असतील?

– पहिल्या आठवड्यात रस्त्याच्या उजव्या बाजुची दुकाने सोमवार, बुधवार आणि शुक्रवार यादिवशी उघडी राहतील; तर रस्त्याच्या डाव्या बाजुची दुकाने मंगळवार आणि गुरुवारी सुरू ठेवता येतील.

– त्या पुढील आठवड्यात रस्त्याच्या डाव्या बाजुची दुकाने सोमवार, बुधवार आणि शुक्रवार यादिवशी उघडी राहतील; तर रस्त्याच्या उजव्या बाजुची दुकाने मंगळवार आणि गुरुवारी सुरू ठेवता येतील.

– अशाच पद्धतीने पुढील आठवड्यांत दुकाने सुरू ठेवता येतील.

– शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने पूर्णत: बंद राहतील.

३. ई कॉमर्स अंतर्गत आवश्यक वस्तूंसह आवश्यकतेतर वस्तूंचे वितरण करण्यासही परवानगी राहील.

४. शासनाने जाहीर केलेल्या ‘ब्रेक द चैन’चे आदेश अस्तित्वात असेपर्यंत हे नियम लागू असतील.

५. शासनाने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे व्यापारी आस्थापनांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर बंधनकारक असेल.

६. सर्व आदेशांची संबंधितांनी तात्काळ अंमलबजावणी करावी. तसंच आदेशांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/unlock-process-in-mumbai-orders-issued-by-the-municipal-commissioner/articleshow/83119648.cms