मुंबई बातम्या

मुंबई लोकल कधी सुरू होणार?; महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या… – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • मुंबईतील लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील
  • मुंबईकरांचे लक्ष आता लोकल ट्रेनकडे
  • महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई: राज्यातील लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढवण्यात आलं आहे. मात्र, करोना संसर्ग कमी झालेल्या जिल्ह्यात स्थानिक पातळीवर बरेच निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मुंबईतही रुग्णसंख्या बरीच आटोक्यात आल्यानं तिथं लोकल ट्रेन कधी सुरू होणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या संदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. (Mumbai Mayor Kishori Pednekar on Local Trains)

वाचा:‘आदित्य ठाकरेंसाठी मुलगी बघायलाही उद्या हे केंद्र सरकारलाच सांगतील’

मुंबईतील लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत महापालिकेकडून राज्य सरकारला काही सांगण्यात आलेलं आहे का, असा प्रश्न महापौरांना विचारण्यात आला होता. त्यावर, ‘मुंबईत लोकल ट्रेन नेमक्या कधी सुरू होणार याचं उत्तम महापालिका देऊ शकत नाही. राज्य सरकार त्याचं उत्तर देईल आणि त्यावर निश्चितच विचार केला जात असेल,’ असं महापौर म्हणाल्या. ‘मागील लॉकडाऊनच्या काळात मी स्वत: लोकलमधून प्रवास केला होता. त्यावेळी बरेचसे लोक विनामास्क प्रवास करत होते. आज जरी आपल्यापैकी अनेकांनी लस घेतली असली तरी मास्क लावणं हे बंधनकारक व महत्त्वाचं आहे. पण एकदा लोकल सुरू झाली की त्याकडं दुर्लक्ष केलं जातं. मागील वेळीही तसं झालं होतं. मोठ्या संख्येनं लोक विनामास्क ये-जा करत होते. त्याचा परिणाम रुग्णसंख्या वाढण्यावर झाला होता. त्यामुळं लोकल ट्रेनसाठी आपल्याला आणखी काही दिवस थांबावं लागेल, असं अंदाज त्यांनी व्यक्त केला. ‘करोनाचं संकट कमी झालंय, पण संपलेलं नाही,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली. त्या ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

वाचा: नेमकं चाललंय काय? पवार भेटीनंतर फडणवीस पोहोचले खडसेंच्या घरी

मुंबईतील रुग्णसंख्या कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये आजपासून काही प्रमाणात सवलती देण्यात आल्या आहेत. सर्वात मोठा दिलासा दुकानदारांना मिळाला आहे. सर्व प्रकारची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी वेळेसह अन्य काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. असं असलं तरी मुंबई खऱ्या अर्थानं रुळावर येण्यासाठी लोकल ट्रेन पूर्ण क्षमतेनं सुरू होण्याची गरज आहे. मात्र, त्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल, अशी चिन्हं आहेत.

वाचा: फडणवीस- पवार भेटीमुळं चर्चेला उधाण; नवाब मलिकांनी केलं ‘हे’ आवाहन

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbaikars-may-have-to-wait-for-local-train-says-mumbai-mayor-kishori-pednekar/articleshow/83140840.cms