मुंबई बातम्या

मुंबईच्या प्राणवायूची नवी मुंबई-ठाण्याकडून वाटमारी – Loksatta

|| प्रसाद रावकर

पालिकांनी परस्पर आपल्याकडे वळविण्याचा प्रकार उघड; पाच दिवस मुंबईत तुटवडा

मुंबई : प्राणवायूचा देशात सर्वत्र तुटवडा जाणवत असताना प्रत्येक राज्य आपल्याला अधिकाधिक पुरवठा व्हावा यासाठी सध्या झगडत आहे. या परिस्थितीत पुरवठादार कंपन्यांकडून मुंबई शहरासाठी वितरित झालेला प्राणवायू ठाणे आणि नवी मुंबई पालिकेने परस्पर आपल्याकडील रुग्णांसाठी वळविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या वाटमारीमुळे मुंबर्ईच्या हिश्शाचा तब्बल ११४ मेट्रिक टन द्रवरूप प्राणवायू पाच दिवसांमध्ये शहरात पोहोचू शकला नाही. त्यामुळे गेल्या आठवड्यात मुंबईत आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. या प्रकरणी मुंबई महापालिकेने पुरवठादाराला नोटीस बजावली असून अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तसेच कोकण विभागीय आयुक्तांसमोर पत्राद्वारे गाऱ्हाणे मांडले आहे.

गरज आणि रुग्णसंख्येनुसार प्रत्येक शहरासाठी प्राणवायूचा हिस्सा निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईसाठी २३४ मेट्रिक टन प्राणवायू उपलब्ध करण्यात येतो. गुजरात, अलिबाग आणि अन्य एका अशा तीन ठिकाणच्या उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध करण्यात येणारा प्राणवायू सतरामदास गॅसेस कंपनीच्या माध्यमातून मुंबई महापालिकेला  मिळतोे. पालिका हा साठा आपली रुग्णालये आणि जम्बो करोना केंद्रांना पुरवते. हीच  कंपनी मुंबईप्रमाणेच ठाणे आणि नवी मुंबईला प्राणवायूचा पुरवठा करते.

ठाणे, तसेच नवी मुंबई पालिकांच्या प्राणवायू वाटमारीची माहिती मिळताच मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंपनीला भेट देऊन पाहणी केली. मुंबईला आपल्या हिश्शाचा पूर्ण प्राणवायू मिळावा यावर देखरेख करण्यासाठी उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या पथकांची रबाळे येथील सतरामदास गॅसेस कंपनी परिसरात नेमणूक करावी, अशी विनंती पालिकेने अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त, तसेच कोकण विभागीय आयुक्तांना पत्राद्वारे केली.

पळवलेला प्राणवायू परत करा…

या प्रकरणी मुंबई महापालिकेने पुरवठादार सतरामदास गॅसेस कंपनीवर नोटीस बजावली असून मुंबईच्या हिश्शाचा अन्य शहरांना दिलेला प्राणवायू त्यांच्या हिश्शातून मिळवून सात दिवसांच्या आत परत करावा, असे या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. नोटीस हातात पडताच कंपनीने मुंबई महापालिकेची माफीही मागितल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘त्या’ पालिकांना विचारल्यावर…

पुरवठादार कंपनीकडे प्राणवायूचा एक टँकर आला होता. तो नवी मुंबई आणि ठाण्यासाठी असल्याचा उल्लेख उत्पादक कंपनीने पाठविलेल्या कागदपत्रांवर होता. त्यामुळे त्यातील गरजेनुसार प्राणवायू नवी मुंबईसाठी घेण्यात आला. उर्वरित प्राणवायू मुंबईसाठी देण्यात आला. त्यानंतर हा टँकर मुंबईसाठी आला होता, असे समजले. याबाबत चौकशी केली असता टंकलेखनाच्या चुकीमुळे नवी मुंबई, ठाण्याचा उल्लेख कागदपत्रांवर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. हा एक गोंधळ वगळता मुंबईचा प्राणवायू नवी मुंबईत वापरलेला नाही, असे नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले, तर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विपिन शर्मा यांच्याशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना लघुसंदेश पाठविण्यात आला; पण यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

झाले काय?

२४ ते २८ एप्रिल या काळात मुंबईच्या हिश्शाचा तब्बल ११४ मेट्रिक टन द्रवरूप प्राणवायू पुरवठादार कंपनीने नवी मुंबई आणि ठाणे शहरांना दिला. सोमवार, २६ एप्रिल रोजी तर मुंबईच्या हिश्शाचा ६२ मेट्रिक टन द्रवरूप प्राणवायू सतरामदास गॅसेस कंपनीत पोहोचला. मात्र त्यापैकी मुंबईला केवळ १३ मेट्रिक टन प्राणवायू मिळाला. या दोन्ही पालिकांनी आपल्याकडील रुग्णांसाठी प्राणवायूचे टँकर परस्पर वळविल्याची माहिती मुंबई पालिकेसमोर आली.

परिणाम काय?  मुंबईला मिळणारा १६ ड्युरो सिलिंडर भरता येतील इतका, चार मेट्रिक टन प्राणवायू शुक्रवार, ३० एप्रिल रोजी सतरामदास गॅसेस कंपनीकडे पोहोचला होता. मात्र हा प्राणवायू नवी मुंबईला उपलब्ध करून देण्यात आला. परिणामी, मुंबई महापालिकेच्या वांद्रे आणि कुर्ला येथील भाभा रुग्णालय, तसेच बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये शुक्रवारी प्राणवायूचा भीषण तुटवडा निर्माण झाला. अन्य रुग्णालयांतून प्राणवायू आणून रुग्णांना वाचविण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on May 2, 2021 1:27 am

Web Title: mumbai oxygen shortage corona virus positive patient akp 94

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-oxygen-shortage-corona-virus-positive-patient-akp-94-2459571/