मुंबई बातम्या

मुंबई: बनावट करोना अहवाल द्यायचे; पोलिसांनी टोळीचा केला पर्दाफाश – Maharashtra Times

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मोबाइल फोनमधील ॲप आणि सॉफ्टवेअरच्या साह्याने वेगवेगळ्या लॅबच्या लेटरहेडवरील मूळ अहवालात फेरफार करून निगेटिव्ह करोना अहवाल देणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. गुन्हे शाखेच्या पथकाने जोगेश्वरी येथून दोघांना अटक केली असून त्यांनी अनेकांना बनावट करोना चाचणी अहवाल दिल्याचे चौकशीतून समोर आले आहे. राशिद शेख आणि बिलाल शेख अशी या आरोपींची नावे आहेत. चाचणी अहवालाचे पैसे हे दोघे ‘गुगल पे’द्वारे घेत होते.

अनेक जिल्ह्यांमध्ये प्रवेशासाठी करोना चाचणी करून येणे बंधनकारक करण्यात आले आहे. करोनाचा अहवाल निगेटिव्ह आला तरच जिल्ह्यात प्रवेश दिला जातो. त्यामुळे करोना निगेटिव्ह अहवालास मागणी आहे. त्यात चाचणी न करता काही जण निगेटिव्ह अहवाल तयार करून देत असल्याची माहिती युनिट १०चे सहायक निरीक्षक वाहिद पठाण यांना मिळाली होती. बनावट अहवाल देऊन लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्यांना पकडण्यासाठी वाहिद पठाण, गणेश तोडकर, धनराज चौधरी, अफरोज शेख यांच्यासह युनिट १०च्या पथकाने प्रभारी पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जोगेश्वरी पूर्वेकडील अब्बास चाळीमध्ये छापा टाकला. येथील एका खोलीमध्ये राशिद शेख आणि बिलाल शेख हे दोघे वेगवेगळ्या लॅबच्या नावाचे अहवाल घेऊन त्यात ॲप व सॉफ्टवेअरच्या मदतीने फेरफार करताना आढळले.

Amravati: ‘त्या’ वाहनाचा गस्तीवरील पोलिसांना संशय आला; रोखण्याचा प्रयत्न केला, पण…

अनेकांना अहवाल दिले

पोलिसांच्या पथकाने राशिद आणि बिलाल या दोघांना अटक केली. चौकशीमध्ये या दोघांनी अनेकांना अशाप्रकारे करोनाचा निगेटिव्ह अहवाल दिल्याचे समोर आले आहे. कोणतीही चाचणी न करता व्यक्तीचे नाव तसेच इतर माहिती घेऊन त्या आधारे बनावट अहवाल तयार करण्यात येत होता. हे बनावट अहवाल व्हॉटसॲपवर पाठवून हे दोघे ‘गुगल पे’च्या माध्यमातून पैसे घेत होते. यांच्या टोळीमध्ये आणखी काहींचा समावेश असण्याची शक्यता असून या टोळीने अशाप्रकारे किती लोकांना बनावट अहवाल दिले याचा तपास पोलिस करीत आहेत.

imageलाच घेताना लिपिकाला अटक

Source: https://maharashtratimes.com/crime-news/mumbai-two-arrested-for-issuing-fake-covid-19-negative-reports/articleshow/82174203.cms