मुंबई बातम्या

मुंबईत प्रवेश करताच चाचणी – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत गेल्या दोन महिन्यांपासून करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून विशेषतः रेल्वेमार्गाने हजारो नागरिक दररोज मुंबईत येतात. येणाऱ्या प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात येणार आहे. कुंभ मेळ्यात सहभागी भाविक परतल्यावर त्यांचीही चाचणी करण्यात येणार आहे.

गर्दीवर नियंत्रणासाठी महापालिकेने यापूर्वी मॉल, पब आदी ठिकाणी कडक निर्बंध लागू केले आहेत. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने मॉल, पब, व्यापारी संकुले, लांब पल्ल्यांच्या गाड्या थांबणारी रेल्वेस्थानके, एसटी डेपो याठिकाणी अँटिजेन चाचण्या केल्या जात आहेत. त्यात सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणी आरटीपीसीआर चाचणी मोठ्या प्रमाणात करण्याचे पालिकेने ठरवले आहे. देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सर्वाधिक प्रवासी हे रेल्वेमार्गाने येत असल्याने मुंबईत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात येणार आहे.

मुंबईच्या प्रवेशद्वारावर करोना चाचणी केंद्र उभारणे शक्य नाही. त्यामुळे मुंबईत प्रवेश करण्याआधीच राज्य सरकार व पालिकेच्या अखत्यारीतील आरोग्य कर्मचारी ठिकठिकाणी तैनात केले असून चाचण्या, तपासण्या करत आहेत. मुंबई महापालिका प्रशासनाने एसटी आगार, रेल्वे स्थानके, विमानतळ या ठिकाणी पुन्हा एकदा लक्ष केंद्रीत केल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

विनामास्क दंड ५०० रुपये?

विना मास्क फिरणाऱ्यांकडून सध्या २०० रुपये दंड आकारण्यात येतो, तो वाढवणे शक्य होईल का याबाबत चर्चा केली जात असून प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्याचा विचार पालिका करत असल्याचे समजते. गेल्या वर्षभरात पालिका रेल्वे आणि पोलिसांनी मिळून ५० कोटींहून अधिक रुपयांचा दंड वसूल केला आहे.

लवकरच आराखडा

करोनाची साखळी तोडण्यासाठी पालिका रुग्णांचा शोध, तपासणी, चाचणी, विलगीकरण या आवश्यक उपाययोजना राबवत आहे. उपाययोजनांना आणखी बळकटी देण्याचा एक भाग म्हणून करोना नियंत्रणाचा नवीन आराखडा बनवला जात आहे. लवकरच हा आराखडा जाहीर होण्याची शक्यता आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/rt-pcr-test-will-mandatory-those-arrives-in-mumbai/articleshow/82154992.cms