मुंबई बातम्या

IPL 2021: विजयी संघात मुंबई इंडियन्स बदल करणार, आज हैदराबादविरुद्ध लढत – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • आयपीएलमध्ये आज मुंबई विरुद्ध हैदराबाद
  • चेन्नईच्या चेपॉक मैदानावर होणार सामना
  • मुंबई इंडियन्स संघात एक बदल होण्याची शक्यता

चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामात आजची नववी लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. मुंबई इंडियन्सने गेल्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सचा १० धावांनी पराभव केला होता. तर सनरायजर्स हैदराबाने या हंगामातील पहिल्या दोन्ही लढती गमावल्या आहेत. ते पहिल्या विजयासाठी मैदानात उतरतील.

मुंबई इंडियन्सला गेल्या सामन्यात विजायनंतर देखील कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. KKR विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव वगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. यामुळेच मुंबईला फक्त १५२ धावा करता आल्या. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स अधिक वेळ पिछाडीवरच होता. पण १५व्या षटकानंतर राहुल चहर आणि अंतिम षटकात ट्रेंट बोल्ट व जसप्रीत बुमराह यांनी केलेल्या कामगिरीमुळे मुंबईला विजय मिळवता आला. त्याआधी पहिल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने त्यांचा पराभव केला होता.

संघात एक बदल होऊ शकतो

आजच्या लढतीत मुंबई इंडियन्स संघात एक बदल होण्याची शक्यता आहे. मार्को जेनसनच्या जागी नाथन कुल्टर नाइलचा संघात समावेश केला जाऊ शकतो. गेल्या सामन्यात ख्रिस लिनच्या जागी क्विंटन डी कॉकला संधी मिळाली होती. पण त्याला काही धावा करता आल्या नाहीत. या वेळी रोहित आणि डी कॉककडून चांगल्या सुरुवातीचा आशा असेल. त्यानंतर येणाऱ्या सूर्यकुमार यादव, इशान किशन, कायरन पोलार्ड आणि हार्दिक पंड्या यांच्याकडून धावसंख्या होणे अपेक्षित आहे.

गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांनी आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. चिंदबरम स्टेडियम फिरकीपटूंसाठी अनुकुल मानले जाते. त्यामुळे क्रुणाल पंड्या आणि राहुल चहर यांच्यावर सर्वांची नजर असेल.

मुंबई इंडियन्सचा संभाव्य संघ-

क्टिंटन डी कॉक, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, मार्को जेनसन/नाथन कुल्टर नाइल, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/ipl-2021-mi-vs-srh-mumbai-indians-probable-xi/articleshow/82117463.cms