मुंबई बातम्या

Break The Chain: कडक निर्बंधांनंतरही मुंबई लोकलमध्ये गर्दी कायम – Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी

मुंबई : करोना नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांनंतरही मुंबई लोकलमधील गर्दी कायम आहे. कल्याण-छत्रपती शिवाजी टर्मिनस मार्गासह चर्चगेट-विरार आणि हार्बर मार्गावरील पनवेल लोकलमध्ये सुरक्षित वावराला हरताळ फासला जात आहे. परिणामी ‘हेच का ते कडक निर्बंध?’ असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

‘सकाळी ८.४२ कल्याण-सीएसएमटी अर्धजलद लोकल. कडक निर्बंध लागू झाल्यानंतरही गर्दी आहे. रेल्वे-राज्य सरकार प्रशासन असो वा रेल्वे पोलिस-रेल्वे सुरक्षा दल या सुरक्षा यंत्रणा. कुणीही गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न करीत नाही’, अशी तक्रार रेल्वे प्रवासी भूषण कुमार यांनी रेल्वेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर केली. लोकलमध्ये उभ्याने प्रवास करणाऱ्यांचे फोटो अनेक जागरूक प्रवाशांनी काढले. प्रवाशांच्या व्हॉट्सअॅप ग्रूपसह, फेसबुक, ट्विटरवर हे फोटो व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावरील हे फोटो चर्चेचा विषय ठरला आहे.

राज्य सरकारने मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय घेऊन लॉकडाउनची घोषणा केली. लॉकडाउनदरम्यान निर्बंध आणि सूट यांची नियमावली जाहीर करण्यात आली. यानंतर पुन्हा अन्य व्यवसायांना सूट देण्याचे आदेश काढण्यात आले. या दोन्ही आदेशांत मुंबई लोकलबाबत कोणत्याही स्पष्ट सूचना नाहीत. ‘राज्य सरकारने केलेल्या सूचनांची रेल्वे प्रशासनाने नेहमीच पूर्तता केली. आताही सूचना आल्यावर त्यांची अंमलबजावणी होईल. लोकलमधील गर्दीबाबत तूर्त थांबा आणि पाहा’, अशी सावध भूमिका रेल्वे प्रशासनाने घेतली आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/coronavirus-mumbai-local-trains-continue-to-run-packed-without-social-distancing/articleshow/81943344.cms